भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची परतफेड करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या स्थळावर हल्ले करत दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराच्या कृतीला पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा दिला. तसेच जर भारताला चिथावणी दिली तर देश “दमदार प्रत्युत्तर” देण्यास पूर्णपणे तयार असल्याचेही यावेळी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून इस्लामाबादने भारतातील १५ लष्करी स्थळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा इशारा दिला. प्रत्युत्तर म्हणून, भारताने गुरुवारी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडारना लक्ष्य केले आणि लाहोरमधील यंत्रणा नष्ट केली.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही नेहमीच एका जबाबदार राष्ट्रासारखे अतिशय संयमाने वागलो आहोत. आम्ही संवादाद्वारे समस्या सोडवण्यावर विश्वास ठेवतो. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणीही आमच्या संयमाचा गैरवापर करेल. जर कोणी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी कालच्या (ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत) सारख्या ‘दमदार प्रत्युत्तराला’ तोंड देण्यासाठी तयार रहावे असेही यावेळी सांगितले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत होते, जिथे अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आपल्या सशस्त्र दलांनी दाखवलेल्या शौर्य आणि धाडसाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केले ते आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही यावेळी सांगितले.
राजनाथ सिंह दिल्लीतील राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आम्हाला गुणवत्तेची भूमिका दिसली. ही कारवाई अकल्पनीय अचूकतेने पार पाडण्यात आली. ही कारवाई कमीत कमी नुकसानासह आणि निष्पापांना कोणतेही नुकसान न पोहोचविता करण्यात आली, असेही यावेळी सांगितले..
संरक्षणमंत्र्यांनी या यशाचे श्रेय भारताच्या सशस्त्र दलांच्या व्यावसायिकता आणि उपकरणांना दिले. आपल्या शक्तिशाली आणि व्यावसायिक प्रशिक्षित दलांकडे उच्च दर्जाची उपकरणे असल्याने हे शक्य झाले असेही यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “२०१४ पासून पंतप्रधान मोदींनी संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या सक्षमीकरणावर भर दिला. त्यांचे मार्गदर्शक तत्वज्ञान ‘संरक्षण सार्वभौमत्व’ होते,” असे सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह म्हणाले की, आमच्या सरकारने संरक्षण उत्पादनात गुणवत्ता आणि प्रमाण यावर समान लक्ष केंद्रित केले आहे. जलद सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही अनेक क्रांतिकारी पावले उचलली आहेत, ज्यात शस्त्रास्त्र कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन समाविष्ट आहे.
संरक्षण पुरवठादार म्हणून भारताच्या विश्वासार्हतेबद्दल बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, ब्रँड इंडियाचा अर्थ असा असावा की जर एखाद्या भारतीय कंपनीने काही वचन दिले तर ते दिले जाईल. जर एखादे उत्पादन विशिष्ट श्रेणी किंवा तापमानात काम करायचे असेल तर ते वचन दिल्याप्रमाणे दिले पाहिजे. ही आमच्या गुणवत्तेची हमी असावी असे सांगत ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय खरेदीदार भारतावर तेव्हाच विश्वास ठेवतील जेव्हा ते अशा मानकांची सातत्याने पूर्तता करते. त्यांनी म्हणायला हवे, ‘शंकेसाठी जाऊ नका, भारतासाठी जा’, असेही सांगितले.
भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेची जनतेला खात्री देताना राजनाथ सिंह पुढे म्हणाले, कोणतीही मर्यादा आम्हाला आमच्या राष्ट्राचे रक्षण करण्यापासून रोखू शकणार नाही. आम्ही कोणत्याही जबाबदार प्रतिसादासाठी पूर्णपणे तयार आहोत. आमचे विस्तारणारे संरक्षण औद्योगिक विश्व आम्हाला अभूतपूर्व शक्ती देत असल्याचेही यावेळी सांगितले.
Speaking at the National Quality Conclave. https://t.co/ctUGFJrigb
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 8, 2025
Marathi e-Batmya