नुकतेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात टिपण्णी करत वाभाडे काढले. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या सरकार गतीमान वेगवान महाराष्ट्र या घोषवाक्यातील पोकळपणा गेवराई पायगाच्या सरपंचाने उघडकीस आणली. राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी छत्रपती संभाजी नगरमधील फुलंब्री येथील पंचायत समितीतील कार्यालयातील अधिकाऱ्याने एका विहिरीच्या मान्यतेसाठी १२ टक्के कमिशनची लाच शेतकऱ्यांना मागितल्याच्या निषेधार्थ गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी दोन लाख रूपये पंचायत समितीच्या कार्यालयातच उधळत अनोखे आंदोलन करत शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
सरपंच मंगेश साबळे यांनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट आणि भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो. त्यांच्याच जिल्ह्यात मागेल त्याला विहिर या योजनेसाठी प्रति विहिर १२ टक्के लाच मागितली जाते. या लाचेची रक्कम आज मी घेऊन आलो असून ती देण्यासाठीच मी ही रक्कम आणल्याचे सांगत आणखी रक्कम लागली तर शेतकऱ्यांसोबत जमा करून देतो असेही मंगेश साबळे यांनी व्हायरल व्हिडिओत सांगितले.
पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासक राज आहे. गेल्या काही महिन्यापासून कार्यालयात शेतकऱ्यांना सिंचन विहिर, जनावरांचा गोठा, पाणंद रस्ता अशा कामांच्या मंजूरीसाठी टक्केवारी ठरलेली आहे. या टक्केवारीने शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. निवडूण आलेले लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. परिणामी शेतकरी भरडला जात आहे. विहिर प्रस्तावासाठी शेतकऱ्याकडे १२ टक्के कमिशन मागण्यात येत असल्याचा आरोपही गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी केला.
यामुळे संतापलेल्या सरपंच साबळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर गळ्यात रोख रकमेच्या पैशांचा हार घळ्यात घालून आंदोलन केले. हे आंदोलन करताना मंगेश साबळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागणारे पैसे मी आणले आहेत. यांना पेन्शन हवी आहे, तरीही यांच्याकडून १२ टक्के कमिशन शेतकऱ्यांकडून हवे आहे असे सांगत त्या गळ्यातील माळांमधून नोटा काढत कार्यालयासमोरच उधळण्यास सुरुवात केली. तसेच आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या शेतकऱ्यांकडून पैसे लागत असतील तर आणखी आणून देतो, अशी संतप्त प्रतिक्रियाही दिली.
यासंदर्भात गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना याबाबत बोलते केले असता ते म्हणाले, माझ्या गावात २० विहिरीचे प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजूरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड, ग्रामरोजगार सेविकांसोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी आणलेले १ लाख रूपये न घेता मला कार्यालयाबाहेर पाठविले. त्यानंतर कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून १२ टक्के प्रमाणे पैसे देण्यास सांगितले. यामुळे आज दोन लाख रूपये मी कार्यालयात आलो पण पैसे घेतले नाहीत असेही साबळे यांनी सांगितले.

Marathi e-Batmya