मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडी सरकारचे स्थानापन्न होवून दोनच दिवस झाले. मात्र शिवसेनेत आपल्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्याला मंत्री पदाची लॉटरी लागू नये यासाठी एकमेकांच्या विरोधात राजकिय षडयंत्र राबविण्याची सुरुवात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विद्यमान राज्याच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातील एका वजनदार शिवसैनिक आमदाराची मंत्री पदी नियुक्त करण्यात आली. याच जिल्ह्यातील आणखी एका कमी वजनदार शिवसैनिक आमदाराने आपल्यालाही नंबर मंत्री पदी लागावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र एकाच जिल्ह्यात दोन मंत्री पदे मिळाल्यास आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होईल आणि सत्तेचे दुसरे केंद्र तयार होईल या भीतीने वजनदार शिवसैनिक मंत्र्याने दुसऱ्या शिवसैनिक आमदाराला मंत्री पदच मिळू नये यासाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने दिली.
याशिवाय मुंबईतील एक शिवसेनेचा आमदार गतवेळच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पदी होता. या राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात बढती मिळण्याचे संकेत आहेत. मात्र या मंत्र्याला मिळणाऱ्या संभावित खात्यावरच मुंबईतीलच ठाकरे घराण्याच्या अंत्यत जवळ असणाऱ्या आणखी एका आमदाराने दावा केला आहे. तसेच त्या माजी राज्यमंत्र्याला ते खाते मिळू नये यासाठी मोठी लॉबिंग सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणातील एका माजी राज्यमंत्र्यालाही बढती मिळण्याची शक्यता असताना तेथील एक धडाडीचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात स्वतःची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वसनीय अशा व्यक्तीच्या मार्फत लॉबिंग करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय अपक्ष आणि ज्या छोट्या पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्या सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षांना राज्यमंत्री पद देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या हिश्शाची चार राज्यमंत्रीपदे सोडून इतर राहीलेल्या मंत्रीपदातून सेनेतील ज्येष्ठ आमदारांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
Marathi e-Batmya