भारतीय हवामान विभागाच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, विजेचा कडकडाट ऐकू आल्यास तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोनचा वापर करू नये. तसेच निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर न पडता पाय एकत्र करून बसून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रुग्णवाहिका व अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात यावेत, तसेच शाळा, सभागृहे व सार्वजनिक इमारती सुरक्षित आश्रयस्थळ म्हणून खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान खात्याचे अद्ययावत संदेश गावपातळीपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे, तसेच यात्रास्थळे व मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Marathi e-Batmya