विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आल्यानंतर संजय राऊत म्हणाले, मी तुरुंगात गेलेला माणूस… हक्कभंग आणला तर मी माझं म्हणणं मांडेन

संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी कोल्हापूरात बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यांच्या या विधानानंतर शिंदे-भाजपाने आक्रमक भूमिका घेत संजय राऊतां विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. तसेच सभागृहाच्या बाहेरही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत संजय राऊत यांच्यावर टीका केली. विधिमंडळात आणण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाबाबत आणि त्यांच्या विधानाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संजय राऊत म्हणाले, ज्या पक्षामुळे आम्हाला पदे मिळाली. त्या पक्षासाठी तुरुंगात जाऊन आलो. तरी आम्ही पक्षनिष्ठा बदलली नाही. त्यामुळे अशी पदे आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो असे सांगत हक्कभंग आणण्यात आल्यानंतर सभागृहात मी माझी बाजू मांडेन असेही स्पष्ट केले.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मी काय म्हणालो होतो, हे समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. ज्याप्रकारे शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते हल्ले करत आहेत. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्यांना उद्देशून मी ते विधान केलं होते. खरं तर माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे, असं स्पष्टीकरण दिले.

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या हक्कभंगाच्या मागणीबाबतही प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, माझ्या विरोधात जर हक्कभंग आणण्यात आला, तर त्यावर चर्चा होईल, मी माझं म्हणणं तिथे मांडेल. मी तुरुंग गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही, असे अप्रत्यक्ष आव्हान शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

आपल्या विधाना मागील भूमिका मांडताना राऊत म्हणाले, माझी ही भूमिका त्यांच्या विरोधात होती, ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न चोरण्याचा प्रयत्न केला. मुळात हा विषय त्यांच्या पुरता मर्यादीत आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी त्यांच्या विषयी ते विधान केलं होते. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवलं, ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली. त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत, असेही म्हणाले.

यासंदर्भात माझी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. मी विधिमंडळाचा अपमान केला नाही. मला तो अपमान करायचाही नाही. मला या सभागृहाचं महत्त्व माहिती आहे. पण गेल्या सहा महिन्यापासून हे सभागृह चोरमंडळाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

About Editor

Check Also

आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय

पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *