संजय राऊत यांचा हल्लाबोल, पलायन करणारी; पळपुट्यांना घेऊन सरकार बनवणारी भाजपा… डॉ.मिधें आणि ४० आमदारांनी जाहिर करावं आम्ही गुलाम

बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी श्रेय घेण्यापासून लांब पळणारी भाजपा आता त्याच श्रेयासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेली दुफळी यासाठी महत्वाची मानली जात असून भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी शिवसेना किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हजर नव्हते सांगत पहिल्यांदाच ठाकरे यांच्या दाव्याला आव्हान दिले. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री डॉ.एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल चढविला आहे.

यावेळी संजय राऊत टीकास्त्र सोडताना म्हणाले, आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही. ज्या पळपुट्यांना घेऊन आज भाजपाने सरकार बनवलं आहे, त्यांची हिंमत एवढी वाढली आहे की ते आता बाळासाहेब ठाकरेंवरही चिखलफेक करू लागले आहेत. त्या चिखलात बसून डॉ. मिंधे आणि ४० आमदार सत्ता उपभोगतायत हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजपा बोललाय. त्यांना माहिती आहे की सत्तेचे मिंधे तोंड उघडणार नाहीत त्यावर. मी तर म्हणेन निषेध म्हणून राजीनामे द्या. आहे का हिंमत तुमच्यात? नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जाहीर करा की आम्ही भाजपाच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंधे आहोत, असे जाहीर आव्हानच दिले.

बाळासाहेब ठाकरेंची, शिवसैनिकांची बाबरी पाडण्यात कोणतीही भूमिका नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतायत. बाळासाहेब ठाकरेंनी बाबरीला शिलेदार पाठवले नव्हते असं ते म्हणतायत. आता यावर जे काही त्यांच्या मांडीला मांडी किंवा अजून काय लावून सरकारमध्ये बसले आहेत आणि काल त्यांच्या चड्डीची नाडी पकडून जे अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते त्या मिस्टर डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या ४० लोकांचं काय म्हणणं आहे? आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार वगैरे जे तीर ते मारत असतात, त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे, असं संजय राऊत आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. तु्म्ही गुलाम झाल्यामुळे, शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील किंवा भाजपाचे लोक सातत्याने शिवसेनेचा, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत. यावर आज मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. पण हिंमत असेल तर. कारण ते गुलाम आहेत. गुलामाला हिंमत नसते. गुलाम हा गुलाम असतो, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
बाबरी तोडली आणि त्यानंतर भाजपानं पलायन केलं हा इतिहास आहे.’बाबरी तोडणारे आमचे, भाजपाचे किंवा अन्य कुणीही नव्हते. ते शिवसैनिक होते’ हे भाजपाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी जाहीर सांगितलं. त्यानंतर लगेच बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की होय, तुम्ही जर पळून गेला असाल आणि बाबरी तोडणारे शिवसैनिक असतील तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, असं संजय राऊतांनी यावेळी भाजपाला सुनावलं.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, स्मार्ट प्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’बाबत तातडीने कार्यवाही करा आढावा बैठकीत दिले निर्देश

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध उपप्रकल्पांना बांधकाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *