नरेंद्र मोदी यांचे भाकित, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये…

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार नाही. कदाचित त्याची जाणीव झाल्यामुळेच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला विरोधी पक्षांना दिला असून महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार असून तसा निश्चय या दोन्ही पक्षांच्या नेत्याने घेतला असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक ) येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना केला.

तसेच पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, मला यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत असून त्यांनीच पूर्वी सांगितले होते की, शिवसेनेची जर काँग्रेस होण्याची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन. आता त्यांच्याच नकली शिवसेनेने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला असल्याने भविष्यात नकली शिवसेनेचे नाव ऐकायला मिळणार नाही असेही सांगितले.

धर्माच्या आधारावर देशाच्या अर्थसंकल्पाचीही फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा गंभीर आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला.

या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार खिल्ली उडविताना कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना म्हणाले की, तुमची सेवा हेच माझ्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय आहे. गेल्या दहा वर्षांत तुम्ही माझे काम पाहिले आहे, आज तिसऱ्या कार्यकालात विकसित भारत बनविण्यासाठी आशीर्वाद मागण्याकरिता मी तुमच्यासमोर आलो आहे, भाजपा -एनडीए आघाडीला प्रचंड विजय मिळणार याची जाणीव इंडी आघाडीच्या एका नेत्याला अगोदरच झाली आहे, असे शरद पवार यांचा नामोल्लेख न करता मोदी म्हणाले. निवडणुकीनंतर सारेजण एकत्र आले तर कदाचित मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान मिळू शकेल, असा त्या नेत्याचा समज आहे. त्यामुळेच नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार हे नक्की आहे. जेव्हा ते घडेल, तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण नक्कीच होईल. जेव्हा आपला पक्ष काँग्रेससोबत जाईल, तेव्हा मी शिवसेनेचे दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. हे दुकान बंद होण्याची वेळ आली, असा याचा अर्थ आहे. विनाशाचा हा क्षण बाळासाहेबांना क्लेश देणारा असेल, कारण नकली शिवसेनेने बाळासाहेबांची सारी स्वप्ने धुळीस मिळविली आहेत. अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द व्हावे, ही बाळासाहेबांची स्वप्ने होती. ती पूर्ण झाली, पण याचा सर्वाधिक विरोध नकली शिवसेनेकडून सुरू आहे, अशी टीकाही यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचा संताप शिगेला पोहोचला आहे, पण नकली शिवसेनेला अहंकारामुळे याची जाणीवही झालेली नाही. काँग्रेससमोर गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला धडा शिकविण्याची स्वाभिमानी महाराष्ट्राची तयारी झालेली आहे, असेही सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज आम्ही गरीबांना मोफत धान्य, पक्की घरे, घराघरात वीज, पाणी, गॅस जोडणी देत आहेत. आम्ही कधीही कोणाचा धर्म पाहिला नाही, कोणाचा धर्म विचारला नाही. सर्वांसाठी योजना बनविल्या जातात, आणि त्याचा लाभ सर्वांना समान रीतीने दिला जातो. पण काँग्रेसची नियत ठीक नाही. देशाच्या अर्थसंकल्पातील १५ टक्के रक्कम केवळ अल्पसंख्याकांसाठी खर्च करावी असा काँग्रेसचा विचार आहे. धर्माच्या नावाने त्यांनी देशाचे विभाजन घडविले, आजही धर्माच्या नावाने अर्थसंकल्पाचे विभाजन करण्याचा तोच डाव पुन्हा खेळला जात आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसने अर्थसंकल्पाचे वितरण धर्मानुसार करण्याच्या प्रस्तावास हिरवा झेंडा दाखविला होता. हा केवढा धोकादायक विचार आहे, पण काँग्रेसकरिता अल्पसंख्याक म्हणजे केवळ त्यांची मतपेढी आहे असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्रातीलच नेता केंद्रात कृषीमंत्री होता, पण त्या सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेतली नाही. आज किसान सन्मान निधीतून दर वर्षी प्रत्येक शेतकरी कुटुंबास महाराष्ट्रात वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळतात. काँग्रेसच्या काळात केवळ खोटी पॅकेज जाहीर होत होती. त्यापैकी एक रुपया देखील शेतकऱ्यास मिळत नव्हता, आम्ही शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य दिले. गेल्या हंगामात सात लाख टन कांदा खरेदी केला, आमच्या सरकारने पहिल्यांदा त्याच्या साठवणुकीची व्यवस्था केली, गेल्या दहा वर्षांत कांद्याची निर्यात ३५ टक्क्यांनी वाढली आहे. दहा दिवसांपूर्वी कांदा निर्यातीवरील निर्बंध हटविले असून दहा दिवसांत २२ हजार टन कांदा निर्यात झाला आहे. कांद्याच्या वाहतुकीवर सबसिडी देण्याची योजना लागू करण्यात येत आहे. क्लस्टर विकास योजनेचा लाभ द्राक्ष उत्पादकांना होईल असा दावाही यावेळी केला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *