Breaking News

कॉम्रेड सीताराम येचुरी, लाल सलाम दिल्लीतील एम्स रूग्णालयात वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय राजकारणात डाव्या विचारांचा चेहरा म्हणून ओळख असलेले आणि सुधारणावादी विचारांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवारी वयाच्या ७२ व्या वर्षी आज निधन झाले.

१९ ऑगस्ट रोजी न्यूमोनियामुळे त्यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रूग्णालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, सीताराम येचुरी यांच्या कुटुंबियांनी त्यांचे शरीर शिक्षण आणि संशोधनासाठी रुग्णालयात दान केल्याचे सांगितले.

कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात येत होते. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी सीताराम येचूरी यांची प्रकृती उपचारांना साथ देईना, त्यामुळे त्यांना श्वाच्छोश्वास घेण्यासाठीसाठी रिस्पटरी सपोर्टवर ठेवण्यात आले. मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाकडूनही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जाहिर केले होते. मात्र आज अखेर कॉम्रेड सीताराम येचुरी यांची प्राणज्योत मालवली.

१२ ऑगस्ट १९५२ रोजी चेन्नई येथे जन्मलेले सीताराम येचुरी हे भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते, ते आघाडी आणि युतीच्या राजकारणासाठी त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनासाठी आणि मार्क्सवादाच्या तत्त्वांप्रती त्यांची अटळ बांधिलकी यासाठी ओळखले जातात.

सीताराम येचुरी यांचा राजकीय प्रवास १९७४ मध्ये सुरू झाला तेव्हा ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाले. विद्यार्थी राजकारणात त्यांचा प्रवास सुरु होत त्यांचा राजकिय प्रवास सुरु झाला, जेएनयू विद्यार्थी संघाचे तीन वेळा अध्यक्ष झाले आणि नंतर एसएफआयच्या अखिल भारतीय अध्यक्ष झाले. १९८४ मध्ये, त्यांची सीपीआय(एम) च्या केंद्रीय समितीवर निवड झाली आणि ते कायम निमंत्रित झाले. १९९२ पर्यंत, ते पॉलिट ब्युरोचे सदस्य होते, हे पद त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ भूषवले.

सीताराम येचुरी यांनी २००५ ते २०१७ या काळात पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले आणि संसदेत काम केले. कॉम्रेड प्रकाश करात यांच्यानंतर २०१५ मध्ये सीपीआय(एम) CPI(M) चे सरचिटणीस बनले आणि २०१८ आणि २०२२ मध्ये त्यांची दोनदा या पदावर पुन्हा निवड झाली.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना “आपल्या देशाची सखोल समज असलेले भारताच्या कल्पनेचे संरक्षक” असे सांगत आदरांजली वाहिली.

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “आम्ही केलेल्या दीर्घ चर्चा मी चुकवणार आहे. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रती माझी मनापासून संवेदना आहे.”

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी येचुरी यांच्या निधनाला राष्ट्रीय राजकारणाचे नुकसान म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत