राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा प्रणित राज्य सरकारला अल्टीमेटम देत जे मराठा आंदोलनाला विरोध करत आहे अशा ओबीसी आणि भाजपाच्या नेत्यांना पाडणार असल्याचा इशारा दिला. तसेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक उमेदवार आगामी विधानसभा निवडणूकीत पाडणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी कोण असा सवाल राजकिय वर्तुळात व्यक्त केला जात असतानाच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक आमदार असल्याचा जाहिर आरोप छगन भुजबळ यांनी आज केला.
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या विरोधात आतापर्यंत कोणी टीका करण्याचे धारिष्ट आतापर्यंत कोणत्याही राजकिय पक्षाकडून किंवा नेत्यांकडून करण्याचे टाळण्यात येत होते. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी सातत्याने करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको असे सांगत मराठा समाजाच्या मागणी विरोधात सातत्याने भूमिका घेत आहेत.
त्यातच अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना त्यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक आमदार राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार हेच असल्याचा आरोप केला.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आंदोलन सोडून गेले होते. मात्र आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना परत आंदोलनस्थळी बसविले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे हेच आमदार असल्याचा आरोपही यावेळी केला.
छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागे आहेत. त्यामुळेच हे आंदोलन निवडणूकीच्या दृष्टीने चिघळवित ठेवल्याची टीकाही यावेळी केली.
यासंदर्भात आमदार राजेश टोपे यांना विचारले असता म्हणाले की, यासंदर्भात मी माझी भूमिका विधानसभेच्या अधिवेशन काळात विधानसभेतच मांडली आहे. त्यामुळे आता मला यासंदर्भात काहीही बोलायचे नाही असे सांगत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
Marathi e-Batmya