हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज करण्यात येत आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारा आधी नागपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज नागपूरात मेळावा घेण्यात आला. तसेच नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटनही केले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, हल्ली भला मोठा हार नाहीतर गुच्छ आणून अभिनंदन करण्याची पद्धत सुरु आहे. मात्र हा भला मोठा हार- गुच्छ आणला की हल्ली संशय यायला लागतो. कारण जितका मोठा गुच्छा तितके मोठे प्रकरण निस्तारण्याचे काम असल्याचा अंदाज येत असल्याची टीपण्णी करत पण मला आज दिलेला मोठा गुच्छ हा चांगल्या भावनेने दिला असेल असे मी समजतो असे सांगत मोठा गुच्छ-फेटा बांधल्याबद्दल नागपूरच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना स्थान मिळणार आहे. त्यांनी चांगले काम करावे असे सांगत नाहीतर अडीच वर्षानंतर पुन्हा वेगळा विचार करावा लागेल आणि मंत्री पदावरचा माणूस बदलावा लागेल. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांने चांगले काम करावे अशी आशा व्यक्त करत मात्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सर्वाधिक आमदारांना संधी मिळावी यासाठी अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात नव्यांना संधी देण्याचा विचार केला असून त्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याचेही यावेळी सांगितले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, अपयशाने खचून जायचे नाही आणि विजयाने हुरळून जायचे नसतं… जबाबदारी ज्यावेळी येते त्यावेळी जबाबदारीचे भान ठेवायचे असते ही शिकवण घेऊन आम्ही काम केले. शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा एकसंघ ठेवणारी आहे. तीच विचारधारा घेऊन आपण काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस याच विचारधारेवर काम करत असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे हे एकच ध्येय महायुतीचे आहे. तीन वर्षे निवडणूकांपासून वंचित राहिलो आहोत. सहकार क्षेत्रातील निवडणूकाही व्हायच्या आहेत. मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार आहेत. पक्षातील आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, विदर्भावर कुठेही अन्याय होणार नाही असा शब्द देतानाच संघटना मजबूत करायची आहे. पक्षाची राष्ट्रीय पक्षाची मान्यता गेली आहे ती मिळवण्यासाठी इतर राज्यात आपण निवडणूका लढवत आहोत असे सांगत आपल्या पक्षाचा यावेळी विदर्भात शंभर टक्के स्ट्राईक रेट राहिला असता परंतु थोड्या फरकाने मोर्शीची जागा गेली नसती तर आपल्याला हे उद्दिष्ट गाठता आले असते अशी खंतही यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya