हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,…महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?, नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा

महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याचाच भाग म्हणून नितेश राणेंना पुढे करून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव असून तो जनतेने ओळखावा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

राज्याचे मत्स्यपालन व बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज प्रक्षोभक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत, त्याचा समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा मंत्री मटन कोणाकडून घ्यायचे व कोणाकडून घ्यायचे नाही हे जाहीरपणे सांगत आहे. कोणी काय खावे व कोणाकडून काय विकत घ्यावे हे सांगण्याचा अधिकार ह्या मंत्र्याला कोणी दिला. हलाल, झटका, किंवा आणखी काय हे जनतेला ठरवण्याचा अधिकार आहे, हे मंत्र्यांचे काम नाही. नितेश राणे यांचा कोणताही अभ्यास नाही, कोणताही विचार नाही, केवळ माझा बॉस सागर बंगल्यावर आहे व माझे कोणी काही करू शकत नाही अशी जाहीर विधाने करून समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. याआधीही नितेश राणेंच्या गुंडांनी कणकवली मध्ये शेख अशरफ या तरुणाला “जय श्रीराम बोल” म्हणत मारहाण केली, याप्रकरणी कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश देऊनही कारवाई केली जात नाही. नितेश राणे उघडपणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून दंगली भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस विभाग काय झोपा काढत आहे का? असा संतप्त सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असे विधान करून या नितेश राणेंनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. या महाशयाचे विधाने पाहता त्यांना कशाचाही अभ्यास नाही, इतिहासाचा तर अजिबात गंध नाही, असे स्पष्ट दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सरनोबत नूरखान बेग तर तोफखाना प्रमुख इब्राहीम खान होता, महाराजांचा अंगरक्षक इब्राहीम सिद्दी तर वकील काझी हैदर होता. अफजल खान भेटीच्यावेळी १० अंगरक्षकांमध्ये हा इब्राहिम सिद्दी होता. तर महाराज आग्र्याच्या कैदेत असताना हिरोजी फर्जत बरोबर मदारी मेहतर ह्या मुस्लीम सेवकाने महत्वाची जबाबदारी पार पाडली होती, यांच्यासह असंख्य मुस्लिम सैनिक महाराजांच्या सैन्यदलात होते, पण ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि गरळच ओकायची ठरवले असेल तर त्यांच्यावर जालीम इलाज केला पाहिजे. बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज संविधान आणि कायद्याला पायदळी तुडवून सातत्याने प्रक्षोभक, भडकाऊ व हिंदू मुस्लीम अशी गरळ ओकत आहेत, त्याला मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे का? आणि नसेल तर राणेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुतीच्या विजयात बोगस मतदान, फिक्सिंग काँग्रेसचे पाच शहरात महापौर तर ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *