तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजं दैदिप्यमान कामगिरी समजली होय. त्याआधी तुम्हाला ती माहित नव्हती का? चित्रपटात विकी कौशल मेल्यानंतर तुम्हाला कसे हाल हाल करून मारले हे कळले. तर अक्षय खन्ना तुमच्यासमोर औरंगजेब बनून आला त्यावेळी तुम्हाला कळले का, तो काय माणू होता म्हणून. पण इतिहासाच्या पानावर काही प्रत्येक गोष्ट लिहून ठेवलेली नसते, त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्याकाळी तेव्हाच्या राजांनी त्यावेळी निर्णय घेतले. आणि इथे तुमची डोकी ३००- ४०० वर्षापूर्वी मेलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन भडकावली जात आहेत. केवळ अन् केवळ तुमचे मुख्य प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये म्हणून लक्ष्य भरकवटण्याची राजकारण खेळले जात असून चित्रपटामुळे जागा होणारा हिंदू काही कामाचा नाही चित्रपट उतरला की ह्यांच हिंदूत्वही उतरला असा खोचक टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज भाजपाप्रणित हिंदूत्ववाद्यांना लागवला.
गुढी पाडव्यानिमित्त मनसेच्या वतीने दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेब वाचायचा असेल तर तो व्हॉट्सअप वाचून उपयोग नाही, तर तुम्हाला पुस्तकातच वाचावा लागणार आहे. त्यामुळे माझे आवाहन आहे की, व्हॉट्सअपवरचा इतिहास वाचण्यापेक्षा पुस्तकातला इतिहास वाचा असे सांगत इतिहासाचे लेखन करणारा एकच लेखक होऊन गेले ते म्हणजे नरहर कुरुंदकर, त्यांनी एक फार सुंदर वाक्य लिहिले आहे ते म्हणजे, मराठे त्यावेळी एकही लढाई जिंकत नव्हते सारखे हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकत नव्हता. ही इतिहास हा त्या त्या वेळी घेतलेल्या राजकिय परिस्थितीनुसारचा निर्णय असतो. पण आता ज्यांची इतिहासावर बोलण्याची लायकी नाही असेही लोक इतिहासावर बोलत आहेत. विधानसभेतही औरंगजेबाच्या कबरवर चर्चा. ते काय त्यांचे काम आहे का असा सवाल करत भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आग्र्याच्या औरंजेबाच्या दरबारात संभाजी महाराजांना ५ हजाराची मनसबदारी दिली. त्यावेळी शिवाजी महाराज तेथे होते. ही गोष्ट शिवाजी महाराजांना मान्य असल्याशिवाय होऊ शकते का पण दिली तर दिली. तो त्यावेळचा राजकिय निर्णय होता. पुढचं पुढं बघू असे म्हणत तो निर्णय त्यांनी मान्य केला. पण त्यानंतर शिवाजी महाराज गेल्यानंतर १६८० मध्ये मृत्यू पावल्यानंतर १६८१ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात आला, ते शिवाजी महाराजाचं राज्य जिंकण्यासाठी आणि मेला १७०७ मध्ये म्हणजे जवळपास २७ वर्षे तो महाराष्ट्रात लढाया करत होता. तो आला कारण त्याला शिवाजी महाराजांचा विचार संपवायचा होता. पण काही केल्या त्याला हे शक्य झालं नाही. पण आताचे सत्ताधारी त्याची संभाजी नगरमधील कबर उखडून टाकण्याची भाषा करत आहेत. औरंगजेबाची कबर ही इथल्या मराठे शाहिच्या शौर्याची निशाणी असताना तिथे कसले उखडून फेकाला निघालात, अफजल खानाची कबर ज्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी बांधली ती उगाच नाही बांधली तर ती जगाला दाखविण्यासाठी बांधली. असे असताना मराठ्यांच्या शौर्याची प्रतिक असलेली गोष्टी आता तुम्ही उखडून टाकायला निघाला आहात, अशा कान पिचक्याही यावेळी मनसैनिकांना दिल्या.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण त्याकडे तुमचं लक्ष जाऊ द्यायचं नाही, तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू नये, तुमच्या हाताला रोजगार मिळू नये, या सारख्या मुख्य विषयांकडे तुमचं लक्ष्य जाऊ नये म्हणून हे असले विषय आणून तुम्हाला भरकटवले जात आहे. यापूर्वीच मी सांगितलं होतं की लाडकी बहिण योजना बंद होणार म्हणून मग आता काय परिस्थिती आहे. तुम्हाला मी खरं सांगितलं तर तुमचा माझ्यावर विश्वास बसला नाही पण त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं तर तुमचा विश्वास बसला अशा कान पिचक्याही मनसेसैनिकांना दिल्या.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, तिकडे प्रयागराजमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. बर त्या कुंभमेळ्याला ५० लाख लोक आले होते असं सांगितलं जाते. पण त्या गंगा नदीत आंघोळ केल्यानंतर अनेक लोक आजारी पडल्याचे वृत्त आले. त्या गंगा नंदीत अर्धवट जळालेली प्रेत, गटाराचं पाणी इतकी घाण सोडण्यात येते मग त्यात आंघोळ केल्यानंतर माणसं आजारी पडणारचं ना असेही सांगितले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नदी म्हणजे जीवन, पण तीच नदी आपण सर्वजण मिळून घाण करत आहोत. तिकडच्या कशा महाराष्ट्रातील नद्यांच उदाहरण घ्या, पुण्याच्या मुळा-मुठा, भीमा, मुंबईची मिठी नदी, उल्हास नदी, या सगळ्या नद्यांच बघितलं तरी आपणच या नद्यांचं घाणीत रूपांतर करत आहोत. या नद्या स्वच्छ कोणी ठेवायच्या, पण आपण ठेवणार नाही. यासंदर्भातील प्रश्न आपण निवडूण दिलेल्या नगरसेवक, आमदार, खासदार यांना विचारत नाही म्हणून हे सगळं सुरू आहे. देशात आजस्थितीला लाखो-कोट्यावधी दररोज बालंक जन्माला येतात आणि त्याच्या संख्येच्या निम्मी लोक मरण पावत आहेत. बरं एकूण लोकसंख्येचा विचार केला मेलेल्या लोकांसाठी किती जंगलतोड करावी लागणार याचा विचार आपण करत नाही. आपण हिंदू असल्याने मृत व्यक्तीला जाळणार, पण त्यासाठी लागणार लाकूड कुठून आणणार किती जंगलतोड आपण करणार असा सवाल करत धर्मात असलेल्या चुकिच्या चालीरिती आपण कधी बदलणार की नाही असा सवालही यावेळी केला.
तसेच राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आताची तरूण पिढी आपलं व्हॉट्स अॅप आणि रिल बनवण्याच्या कामाला जुपुंन राहिली आहे. का तर हाताला काम नाही म्हणून, हे असंल सगळं आपल्याला थांबवल पाहिजे, नाही तर बाहेरून आलेल्या आस्थापना आपल्यालाच म्हणतं राहतील, मराठी येत नाही तर काय करायचं ते कर म्हणून पण मराठी हि भाषा या महाराष्ट्राची, मुंबईची आहे. त्यामुळे इथे मराठीचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असा इशाराही राज्य सरकारला दिला.
राज ठाकरे म्हणाले की, या मुंबईत पाच नद्या होत्या, त्यातील चार मेल्या आता पाचवी मिठी नदी शिल्लक आहे. तीही मरणाच्या अवस्थेत आहे. त्यामुळे आपल्याला जर सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिजे असेल तर त्या सर्व गोष्टी आपल्याला जपाव्या लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायला सुरु आपले या मुळ विषयावरून लक्ष हटविण्यासाठीच या गोष्टी आणल्या जात असल्याचा आरोपही यावेळी भाजपाचे नाव न घेता केला.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी तुर्कीस्तानचे उदाहरण देत, तेथील केमाल पाशा हा रजसत्तेवर आला, त्याने तेथील देशाला असलेला मुस्लिम देशाचा दर्जा काढून टाकला आणि सर्व जातीच्या लोकांना, पाश्चात्य पद्धतीच्या पोशाखाला आणि जीवन पद्धतीला प्रोत्साहन दिले. तेथेही मुस्लिम वगैरे सगळे आहेत. पण त्यांचा धर्म रस्त्यावर येत नाही तो त्यांच्या उंबऱ्याच्या आतमध्ये. आज स्थितीला तुर्किस्तानला पूर्वेचा युरोप म्हणटं जात आहे. त्यामुळे जातीच्या-धर्माच्या नावावर काही होत नाही, झालाच तर ऱ्हासच होतो. त्यामुळे आज तुर्किस्तानचे उत्पन्न सर्वाधिक आहे. अन् आपण पुन्हा धर्मवादाकडे जात आहोत, स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून जाहिर करण्याच्या नादात आहोत अशी उपरोधिक टीका भाजपाचे नाव न घेता करत राज्यात देशात कोणीही सत्ताधारी असो लोकांना त्यांच्या मुख्य प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये यासाठी त्यांच्याकडून असले धर्माचे प्रश्न पुढे आणले जात असल्याची टीकाही केली.
यावेळी राज ठाकरे यांनी मिठी नदी आणि गंगा नदीचे काही व्हिडिओही दाखवले.
Marathi e-Batmya