हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले? नांदेडच्या विकासात बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान

स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण कुटुंबियांचे अनन्यसाधारण योगदान आहे. या भागात त्यांनी केलेले कार्य दिर्घकाळ लक्षात राहणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, कमलकिशोर कदम, माधवराव किन्हाळकर, खासदार रविंद्र चव्हाण, खा. शिवाजीराव काळगे, खा. कल्याण काळे, खा. शोभा बच्छाव, खा. अजित गोपछेडे, आ. प्रताप चिखलीकर, नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर यांच्यासह विविध पक्षातील नेते पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा म्हणजे पांग फेडण्याचा कार्यक्रम आहे. वेगळवेगळे पक्ष, धर्म, जात असली तरी सर्वांना सोबत घेऊन जावे हे आपले संस्कार आहेत. पण आज राज्यात अत्यंत खालच्या पातळीवर बोलले जाते, जात व धर्माच्या नावावर काय चालले आहे त्यावर तर बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे परंतु या पावन भूमितील समाज जर जातीपातीत विभागला जात असेल, किराणा माल घेतानाही जात बघितली जात असेल तर कुठे नेऊन ठेवला आहे मराठवाडा माझा, असे विचारावे वाटते. पुढील काळात सद्भावना व सद्भावनाच जोपासा व विषारी वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केले.

यावेळी सर्व मान्यवरांनी बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाचा मिळावे असा कायदा महाराष्ट्र विधिमंडळात एकमुखाने झालेला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती तर आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मराठा समाजाला मीच आरक्षण देऊ शकतो अशी वल्गणा केली होती, त्याचे काय झाले असा प्रश्न विचारून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे जाती पातीच्या व धर्माच्या पलीकडे जाऊन बघितले पाहिजे असे म्हटले आहे.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *