भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत बांगलादेशी -रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अत्यंत हिन राजकारण करते. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा व अमित साटम यांनी हिंदु मुस्लीम वाद उकरून काढला. मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? परत पाठवले ? हा प्रश्नाचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरातून भाजपाचे कुभांड उघड झाले आहे.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, लोढा व भाजपाच्या नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर आता मुंबईतून मागील तीन वर्षात किती बांगलादेशी पकडले, याची अधिकृत माहिती जाहीर करावी, असे खुले आव्हान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले.
मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांनी बांग्लादेशींच्या मुद्द्यावरून छाती पिटून काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक नेतृत्वाला लक्ष्य केले. मालवणी येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशाने बांग्लादेशी-रोहिंग्या नावाने हिंदू आणि दलितांचीही घरे तोडली गेली. आता माहितीच्या अधिकारान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाला गेल्या तीन वर्षांत मुंबईत किती बांगलादेशी-रोहिंग्या पकडले? मुंबई पोलीसांनी किती प्रकरणे FRRO कडे सोपविली तसेच कितींना बांग्लादेशात परत पाठवले यांची प्रति महिना आकडेवारी व संपूर्ण माहिती मागितली असता, उत्तर मिळाले – “आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही”. ज्या गृहमंत्रालयाकडे हे काम आहे त्या विभागात जर माहिती उपलब्ध नाही असे उत्तर मिळाले व एका विभागातून दुसरीकडे टोलवाटोलवी चालू असेल तर किती खालच्या पातळीवर हे राजकारण होत आहे हे मुंबईकरांनी ओळखावे. देशाचे गृहमंत्री स्वत: घुसखोरांच्या नावाने बोंब ठोकत असतात हे विशेष. देशात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी घुसले हा भाजपाचा दावा मान्य करायचा तर मागील १२ वर्षांपासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे. मोदी-शाह यांच्या हाती देश सुरक्षित आहे तर हे बांग्लादेशी देशात आलेच कसे? डबल इंजिन सरकार काय झोपा काढत होते? असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
प्रत्येक निवडणुकीत भाजपा नेते बांगलादेशी -रोहिंग्या भारतात आहेत या नावाने ध्रुवीकरणाचे कारस्थान करत असतात. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून प्रथम मंगल प्रभात लोढा नंतर अमित साटम तसेच इतर @BJP4Mumbai नेत्यांनी छाती पिटून रुदन सुरू केले आणि काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक… https://t.co/pCfKXt0sy7 pic.twitter.com/AWeUIERb8X
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 9, 2026
सचिन सावंत पुढे म्हणाले की, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी काही दिवसापूर्वी टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेज (TISS) च्या एका अहवालाचा आधार घेत मुंबईत मुस्लिमांची लोकसंख्या वाढली व हिंदुंची कमी झाली, असा दावा केला. असाच दावा दिल्ली निवडणुकीच्या आधी भाजापाने जेएनयुचा अहवालाच्या आधारे केला होता. याचे फॅक्टचेक बूमलाईव्ह संस्थेने केले असता दोन्ही संस्थांच्या अहवालातील शब्द ना शब्द जवळपास सारखेच निघाले. यामध्ये अहवाल देणारी काही माणसे ही समान होती. विशेष म्हणजे यामध्ये कोणीही तज्ञ नव्हते. भाषाही विखारी होती. असे बूम लाईव्ह संस्थेचा अहवाल सांगतो. दोन्ही संस्था आता संघाच्या प्रभावाखाली गेल्या आहेत. निवडणूक आल्याने खोटी माहिती पसरवून भाजपा मुंबई व महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे. बूम लाईव्ह संस्थेने भाजपाचा अजेंडा उघड केला आहे. भाजपाच्या भूलथापांना व धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या अजेंड्याला मुंबईकर बळी पडणार नाही, अशी आशाही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya