डॉ पंकज भोयर यांची माहिती, नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला सुधारित धोरणाच्या आधारे गती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती

पोलीस ठाणे निर्मितीबाबत सुधारित धोरण तयार करण्यास गती देण्यात यावी, नवीन पोलीस ठाणेची निर्मिती करताना अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता, पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढणारा कामाचा ताण यामुळे वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्रालयात गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस सर्वश्री आमदार समीर कुणावार, अमोल पाटील, सुहास बाबर तसेच विशेष पोलीस निरीक्षक सुवेज हक, गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. यासह जळगाव, वर्धा आणि सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील देवगाव, सांगली जिल्ह्यातील खानापूर तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण येथे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचा भुसावळ उपविभागात समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी वरणगाव पोलीस ठाणे हे मुक्ताईनगर विभागातून भुसावळ उपविभागात समावेश करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

गृह राज्यमंत्री  डॉ. पंकज भोयर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबतचे निश्चित धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हयांची संख्या, लोकसंख्येची घनता, विशेष भौगोलिक स्थान, मोठी धार्मिक व पर्यटन स्थळे, सुरक्षेच्या दृष्टीने अतीमहत्वाची ठिकाणे, औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे जीवनमान पद्धतीत झालेला बदल, त्यानुसार गुन्ह्यांचे बदललेले स्वरुप महत्त्वाचे ठरते आहे.

पुढे बोलताना डॉ पंकज भोयर म्हणाले की, यासह तंत्रज्ञानाचा समाजात मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार व वाढता वापर त्या माध्यमातून होणारे आर्थिक फसवणूकीचे गुन्हे या अनुषंगाने नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस स्टेशन निर्माण केल्यानंतर त्याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचेही सांगितले.

या बैठकीत राज्यातील नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावांची सद्यस्थिती, निकषांमधील आवश्यक सुधारणा तसेच मनुष्यबळाच्या उपलब्धते संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *