पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू: मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता हडपसर येथे मोठा साठा जप्त, बॅरल भरून विषारी दारूचे स्टॉक

पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात संशयित विषारी दारूमुळे मृत्यूंचे सत्र सुरूच असून मृतांचा आकडा वाढत असल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक परिसरात या घटनेने भीती, संताप आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दुर्घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक घटना फुगेवाडी येथे घडली. विजय राठोड आणि विजू राठोड या दोन सख्ख्या भावांचा कथित विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला. तर त्यांचे वडील प्रकाश राठोड यांनीही त्याच दारूचे सेवन केल्याने त्यांची दृष्टी गेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही भाऊ हे कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात लहान मुले असून पत्नी सारिका आणि संगीता राठोड यांनी प्रशासनाकडे न्याय आणि तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली. “आमचे पती आम्हाला सोडून गेले… आता मुलांचे शिक्षण आणि संसार कसा चालवायचा?” असा आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, अकबर अझीम खान पठाण यांना बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्याने ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. तसेच राजेश राजपूत यांचाही गुरुवारी सकाळी अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. आनंद निकाळजे आणि आनंद देसाई या आणखी दोघांचा उशिरा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. सर्व मृतांचे शवविच्छेदन वायसीएम रुग्णालयात करण्यात आले.

हडपसरमधील पांढरे मळा परिसरातूनही अशीच घटना समोर आली आहे. अनधिकृत दारू अड्ड्यावरून खरेदी केलेली दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मद्यपानानंतर पीडितांना पोटदुखी, मळमळ आणि अचानक प्रकृती खालावल्याची लक्षणे दिसून आली होती.

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरात अनेक दिवसांपासून बेकायदेशीर दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा रहिवाशांनी केला. काहींनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा झाल्याचे सांगितले. विषारी दारूचा स्रोत शोधण्यात आला असून या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. “ही अत्यंत गंभीर घटना असून विषारी दारू तयार करणारे आणि पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हा प्रकार म्हणजे खुनापेक्षा कमी नाही,” असे म्हटले.

अमितेश कुमार यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले असून तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुरवठा साखळीतील प्रत्येक व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे बेकायदेशीर दारू विक्री, प्रशासनाची निष्काळजीपणा आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून मृतांच्या कुटुंबीयांकडून दोषींवर कठोर कारवाईसह न्यायाची मागणी होत आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या अर्धा डझन मंत्र्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता कांद्याला १५०० रुपये नाही तर ३००० रुपयेच भाव द्या, बकरी ईदच्या निमित्ताने दंगली भडकवण्याचे भाजपाचे षडयंत्र, भाजपाच्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *