हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, प्रभू रामाच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी? अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच ‘खास’ लोक; रामभक्ताच्या देणग्यांचा हिशोब द्या, काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचा नाशिकच्या काळाराम मंदिरातून शुभारंभ, ९ तारखेपासून राज्यभर सत्याग्रह

अयोध्येमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने प्रभू रामाचे मंदिर बांधण्यात आले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली. या विश्वस्तांमध्ये भाजपा, आरएसएस व मोदींच्या खास लोकांना नियुक्त केले व या ट्रस्टला आरटीआयच्या कक्षेतून बाहेर ठेवले. जगभरातील कोट्यवधी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने प्रभू राम चरणी दान व देणगीच्या स्वरुपात अब्जावधी रुपये अर्पण केले, सोने चांदीच्या विटा, आभुषणे अर्पण केली. पण या रामधनावर विश्वस्त मंडळानेच दरोडा टाकला. या दरोड्याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

प्रभू रामाला लुटणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यभर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आयोजित केला असून याची सुरुवात नाशिकच्या काळाराम मंदिरातून करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या या सत्याग्रहात खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शरद अहिर, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश ऊर्फ बब्लू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर, प्रदेश सरचिटणीस संदीप पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्याग्रहाची सुरुवात रघुपती राघव राजाराम या भजनाने करण्यात आली, त्यानंतर खरा तो एकची धर्म व सत्याग्रहाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राम मंदिरात अनेक दिवस लुट सुरु होती, चोरी कोणी केली, कशी केली हे सर्वांना माहित झाले आहे. भाजपा परिवारातील अनेक लोकांना ही चोरी माहित आहे, पण ते बोलत नाहीत. श्रीरामालाच लुटल्याने सर्वत्र तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे पण आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चकार शब्द काढलेला नाही. एसआयटी चौकशी सुरु असल्याचे दाखवले जात आहे. पण ही चौकशी निव्वळ धुळफेक आहे. काल चंपत राय व अनिल मिश्रा यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. आदिवासी, मागासवर्गीय अथवा अल्पसंख्याक समाजाचा जर कोणी आरोपी असता तर त्यांच्या घरावर लगेच बुलडोझर चालवला असता, आता चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा सवालही यावेळी केला.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, प्रभू रामाला लुटणाऱ्या भाजपा आरएसएसच्या दरोडेखोरां विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये ढगफुटी होणार असल्याची अफवा पसरवली होती. पण नाशिकचा सत्याग्रह तर झालाच आहे. पण दिनांक ९ जुलैपासून राज्यभर काँग्रेसचा हा सत्याग्रह होणार आहे. आमच्या मनात राम आहे, संविधानात राम आहे, त्यामुळे ‘मुहँ मे राम, बगल में नथुराम’वाल्यांनी काँग्रेसला रामभक्ती बद्दल शिकवू नये. हा सत्याग्रह सुरुच राहणार असून प्रभू रामाला लुटणाऱ्या भाजपाला प्रायश्चित करायला लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, जळगावमधील बेपत्ता महिलेच्या प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा चूकीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन,निष्कासनाचीही प्रक्रिया करू

जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत  गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या प्रकरणातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *