विजय वडेट्टीवार यांची मागणी, राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक, संयुक्त समितीकडे पाठवा विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्ती नसाव्या, विश्वस्त मंडळावरील सदस्यांना भत्ते देऊ नये

विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावर चर्चा करताना काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांनी विधेयकातील अनेक तरतुदींवर गंभीर आक्षेप नोंदवत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रभू रामचंद्रांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा आणि भक्ती आहे. त्यामुळे रामटेकसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक मंदिराच्या व्यवस्थापनात कोणतीही घाईघाईने किंवा राजकीय हस्तक्षेपातून निर्णय घेता कामा नये. मंदिर विश्वस्त मंडळात लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्तींना स्थान देण्याऐवजी सेवाभावी, निष्कलंक आणि श्रद्धेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना संधी दिली पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या विद्यमान समितीच्या कारभारात कोणतीही गडबड किंवा गैरव्यवहार झाला नसताना नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याची आवश्यकता काय आहे? मंदिरांच्या व्यवस्थापनात राजकारण आणल्यास श्रद्धेच्या केंद्रांवर जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. अयोध्येच्या राम मंदिराच्या तिजोरीत चोरी झाली, त्यामुळे श्रद्धाळूंच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. अशा वेळी रामटेक मंदिरातील विश्वस्त मंडळ का बदलले जात आहे? तीन आठवडे अधिवेशन असताना हे विधेयक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का आणले गेले? इतकी घाई का केली जात आहे असा सवाल उपस्थित केला.

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अयोध्येतील कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या वृत्ताचा संदर्भ देत सांगितले की, जिथे श्रद्धा आणि भक्ती आहे तिथे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे. भाविकांच्या दानाचा विनियोग अत्यंत जबाबदारीने झाला पाहिजे. या मंदिरातील विश्वस्त मंडळातील सदस्यांना भत्ते का देण्यात येणार? प्रभू रामचंद्राच्या मंदिरात सेवेच्या भावनेने काम झालं पाहिजे, मंदिरात आलेल्या दानातून सदस्यांना भत्ते का दिले जाणार? असा गंभीर सवाल उपस्थित केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोणतेही गुन्हे, भ्रष्टाचार किंवा नैतिक अधःपतनाचे आरोप असलेल्या व्यक्तींना विश्वस्त मंडळावर नियुक्त करता कामा नये, एकही गुन्हा असेल तर त्या व्यक्तीची नियुक्तीच झाली नाही पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते “अगर पहरा देने वाला कुत्ता चोरों को देखकर न भोंके, तो समझना चाहिए कि वो चोरों को जानता है।” त्यामुळे विश्वस्त मंडळावर नेमताना कोणाची नेमणूक करता हे महत्वाचे आहे. आम्ही काही टीका केली की विरोधकाना भाड्याची लोक, कुत्रे असे संबोधन केले गेले पण महत्वाच्या बिलावर भूमिका मांडत असल्याचे स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, रामटेक मंदिर हे हजारो वर्षांची परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपणारे श्रद्धास्थान असल्याने त्याचे संवर्धन, जतन आणि पुनर्निर्माण यावर भर देणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये. या विश्वस्त मंडळावर आमदार, नगराध्यक्ष यांची नियुक्ती करता येऊ नये. आमदार, मंत्री मतदारसंघात व्यस्त असतात, अशावेळी मंदिराचा कारभार कसा सुरू आहे, याकडे कोण लक्ष देईल? जबाबदारी कोण घेईल? असे प्रश्नही उपस्थित केले.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाविकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी विधेयकातील तरतुदींचा सखोल विचार करण्याची गरज आहे. प्रभू राम हे श्रद्धेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावावर राजकारण नव्हे, तर पारदर्शक आणि जनविश्वासावर आधारित व्यवस्था उभी राहिली पाहिजे, असे सांगत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवून सर्व संबंधित घटकांच्या सूचना विचारात घेण्याची मागणी केली.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा इशारा, रामटेक मंदिर ट्रस्टमध्ये इतका भ्रष्टाचार होईल की अयोध्येचे मंदिरही मागे पडेल विश्वस्तांमध्ये भोसले कुटुंबातील एकच व्यक्ती का

‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ आज विधानसभेत मांडण्यात आले. राजकारणी लोकांना ट्रस्टवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *