मागील चार दिवसापासून मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होईल असे काही नको असे निरिक्षण नोंदवित २४ तासात आझाद मैदान वगळता इतरत्र होणारी गर्दी हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या प्रशासनाला दिले. तसेच पाच हजार पेक्षा जास्त आंदोलक नको असेही बजावले.
आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयत तातडीने सुनावणी घेण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकाच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत असतानाच मनोज जरांगे पाटील यांचे वकील पिंगळे म्हणाले की, तर रस्ते अडवायला, गर्दी करायला जरांगे पाटील यांनी आंदोलकांना सांगितले नव्हते. त्यावर उच्च न्यायालयाने मग रस्त्यांवर फिरणाऱ्यांना मुंबईतून बाहेर घालविणार का असा सवाल करत न्यायालयासमोर डिप्लोमॅटीक वागू नका असेही न्यायालयाने मराठा आंदोलकांच्या वकीलांना सुनावले.
मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांचे वकील आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तीवाद करत आपापली बाजू मांडली. जवळपास न्यायालयाने २ तास या सर्वांची बाजू ऐकून घेतली.
मुंबई उच्च न्यायालय पुढे म्हणाले की, आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी आहे. आझाद मैदान वगळता इतर कुठेही आंदोलक नको असे सांगत दक्षिण मुंबईतील रस्ते उद्या चार वाजेपर्यंत रिकामे करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला देत आणखी आंदोलक मुंबईत येणार असतील तर त्यांना मुंबईच्या बाहेर थांबवावे. तसेच आणखी आंदोलक आल्यास राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावित असे स्पष्ट निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना जेवण आणि पाणी आणण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली. त्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जेवणाचे ट्रक मुंबईत घेऊन येणाऱ्यांना परवानगी देऊ नका अशी मागणी करत जर असं केलं तरइतर समाजालाही परवानगी द्यावी लागेल अशी मागणी केली. त्यावर उच्च न्यायालयाने सांगितले की, आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. न्यायालयाने दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल, मुंबईतील रस्त्यांवर आंदोलन नको आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्यावे असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. त्याचबरोबर याप्रकरणाची सुनावणी उद्या पुन्हा होणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान न्यायालयाच्या आदेशाचे पालन आम्ही केले. परंतु २९ आणि ३० ऑगस्ट रोजी भरपूर पाऊस होता. आझाद मैदानात चिखल झाला होता. मराठा समाजाने कुणाचा हक्क हिरावून घेतला नाही. वाईट गोष्टी सरकारने न्यायालयासमोर दाखवल्या. हे सरकार विरोधी आंदोलन आहे. लोकांना त्रास देणारे नाही. काही समाजकंटक बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटेल पाच हजारापेक्षा जास्त आंदोलक नको असे न्यायालयाने सांगितले त्यावर मनोज जरांगे पाटील निर्णय घेतील असे मराठा आंदोलनाचे वकील पिंगळे यांनी सांगितले.
Marathi e-Batmya