दिल्ली उच्च न्यायालयाचे बाबा रामदेवला निर्देश, व्हिडिओतील आक्षेपार्ह भाग हटवा शरबत जिहाद प्रकरणी नवा व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात

यापूर्वीच्या न्यायालयाच्या निर्देशांनी अशा विधानांना मनाई केली असतानाही, हमदर्दच्या रूह अफजाविरुद्ध त्यांच्या वादग्रस्त “शरबत जिहाद” विधानाची पुनरावृत्ती करणारा एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केल्याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की रामदेव “कोणाच्याही नियंत्रणात नव्हते” आणि “स्वतःच्या जगात राहत होते”, ज्यामुळे त्यांना प्रथमदर्शनी मागील आदेशाचा अवमान झाल्याचे आढळले.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, बाबा रामदेव यांनी सोशल मीडियासह सर्व सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओचा वादग्रस्त भाग २४ तासांच्या आत हटवण्यास सहमती दर्शविली आहे, असे त्यांच्या वकिलाने सांगितले.

पतंजलीच्या “गुलाब शरबत” चा प्रचार करताना केलेल्या आक्षेपार्ह विधानांबद्दल हमदर्द नॅशनल फाउंडेशन (इंडिया) ने बाबा रामदेव आणि पतंजली फूड्स लिमिटेड विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित हे प्रकरण आहे.

प्रचारात्मक साहित्यात, बाबा रामदेव यांनी असा दावा केला आहे की, रूह अफजाच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा वापर मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी केला जात आहे आणि त्याला “शरबत जिहाद” असे संबोधले आहे – ही संज्ञा मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने तीव्र टीका केली होती.

२२ एप्रिल रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या वक्त्व्यांवर नापसंती व्यक्त केली आणि म्हटले की, या वक्तव्यानी न्यायालयाचा “विवेक हादरवला” आणि ते समर्थनीय नाहीत. त्यानंतर, बाबा रामदेव यांनी न्यायालयाला आश्वासन दिले की ते संबंधित सर्व व्हिडिओ आणि जाहिराती काढून टाकतील आणि भविष्यात असे विधान करण्यापासून ते परावृत्त होतील याची पुष्टी करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.

तथापि, बाबा रामदेव यांनी नव्याने जाहिर केलेल्या नवीनतम व्हिडिओमुळे न्यायालयाला खात्री पटली नाही.

उच्च न्यायालयाने यावर स्पष्ट केले की, “मला त्यांच्या राजकीय विचारांची पर्वा नाही. मला या खटल्याची चिंता आहे. आम्ही पालन कसे सुनिश्चित करू… की तो त्यांच्या नावाचा, त्यांच्या वस्तूंचा उल्लेख करत नाही? असा सवालही उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी केला.
नायर यांनी उत्तर दिले की, बाबा रामदेव यांच्याविरुद्ध कायमस्वरूपी बंदीचा आदेश असू शकत नाही. यावर उच्च न्यायालयाने म्हटले, जर हीच भूमिका असेल, तर आम्ही अवमान नोटीस जारी करू. नवीन व्हिडिओचा सूर आणि भाव जवळजवळ सारखाच असल्याचेही यावेळी नमूद केले.

बाबा रामदेव यांचा नवीनतम व्हिडिओ काढून टाकला जाईल असे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर, न्यायालयाने न्यायालयाच्या अवमान नोटीस जारी केली नाही.

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बाबा रामदेव यांच्या वारंवार केलेल्या अवमानावर भाष्य केले आणि म्हटले की, तो कोणाच्याही नियंत्रणात नाही. तो स्वतःच्या जगात राहतो अशा शब्दात फटकारले.

त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने यापूर्वी असे निरीक्षण नोंदवले होते की, मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हमदर्दच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी असा युक्तिवाद केला की, हा मुद्दा अपमानाच्या पलीकडे गेला आहे आणि तो “द्वेषपूर्ण भाषणासारखा” आहे, ज्याचा उद्देश जातीय तेढ निर्माण करणे आहे. ते काढून टाकले पाहिजे! असे ठामपणे सांगितले.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर सुमारे एक तासानंतर, बाबा रामदेव यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, पतंजली समूह सर्व संबंधित व्हिडिओ काढून टाकत आहे.

“मला [सूचना देण्यात आली आहे] आणि आम्ही व्हिडिओ काढून टाकत आहोत,” असे वकिलाने न्यायालयाला सांगितले. पुढे वकील म्हणाले की, माझ्या नियंत्रणात जे काही आहे ते काढून टाकले जाईल, असे आश्वासन देत आणि जर अतिरिक्त सामग्री आढळली तर “ते आम्हाला देऊ शकतात” असेही सांगितले.

बाबा रामदेव यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पतंजलीचे गुलाबाचे शरबत लाँच करताना प्रश्न उपस्थित केले होते. शरबत लाँच दरम्यान, बाबा रामदेव म्हणाले, “एक कंपनी आहे जी तुम्हाला शरबत देते, परंतु त्यातून मिळणारे पैसे मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी वापरले जातात. त्यांनी हमदर्द किंवा रूह अफझाचे नाव घेतले नसले तरी, त्यांच्या टिप्पण्या लोकप्रिय पेयाकडे निर्देशित असल्याचे समजले जात होते.

बाबा रामदेव यांनी त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करताना म्हणाले होते की, जर तुम्ही ते शरबत प्याल तर मदरसे आणि मशिदी बांधल्या जातील. पण जर तुम्ही हे [पतंजलीच्या गुलाबाच्या शरबताचा संदर्भ देत] प्याल तर गुरुकुल बांधले जातील, आचार्य कुलम विकसित होतील, पतंजली विद्यापीठाचा विस्तार होईल आणि भारतीय शिक्षा मंडळ वाढेल असे जाहिर वक्तव्य केले होते.

जसा लव्ह जिहाद आहे तसाच हा देखील एक प्रकारचा शरबत जिहाद आहे. या शरबत जिहादपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले होते, त्यामुळे हमदर्दने या वक्तव्याप्रकरणी याचिका दाखल करण्यास प्रवृत्त केले.
तसेच बाबा रामदेव यांनी इतर शरबत ब्रँडची तुलना “टॉयलेट क्लीनर” शी करताना म्हणाले की, तुमच्या कुटुंबाचे आणि निष्पाप मुलांना शीतपेये आणि शरबत जिहाद म्हणून विकल्या जाणाऱ्या टॉयलेट क्लीनरच्या विषापासून वाचवा. फक्त पतंजली शरबत आणि ज्यूस निवडा, अशा पद्धतीचा प्रचार ब्रँडने सोशल मीडियावर जाहीर केला.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, चित्रपट निर्मिती जोखमीचा व्यवसाय केवळ नफा न मिळणे हा फसवणूकीचा व्यवसाय ठरू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका चित्रपट निर्मात्यावरील फसवणुकीचा खटला रद्द केला, ज्याने चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *