गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामराची उच्च न्यायालयात धाव; तातडीची सुनावणी मंगळवारी उच्च न्यायालयाकडून सुनावणी

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हस्यकलाकार कुणाल कामराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी संबंधित एकलपीठाकडे दाद मागण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कुणाल कामराच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती कुणाल कामराच्या वतीने वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी उच्च न्यायालयाच्या न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाकडे केली. तसेच, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून याच कारणास्तव अंतरिम संरक्षण मिळाले असल्यामुळे, आम्ही अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करत नसल्याचेही सिरवई यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.

त्यावर, उच्च न्यायालयाने सांगितले की, कुणाल कामराच्या जीवाला धोका असल्याच्या कारणास्तव आम्ही गुन्हा रद्द करण्याच्या मागणीवर तातडीने सुनावणी घेऊ. परंतु, अंतरिम संरक्षणासाठी तुम्ही संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी. आम्ही हा मुद्दा अजिबात ऐकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट करून गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी ठेवली.

प्रकरण काय ? 

कुणाल कामराने आपल्या कार्यक्रमामध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ देताना महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली, असे म्हणत कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणेही केलं होते. मात्र, व्यंगात्मक गाणे सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच, कुणाल कामराविरोधात तक्रारही दाखल केली होती.

कामराची मागणी काय

विडंबनात्मक गाणे गायल्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात शिवसेना (शिंदे) पक्षा वतीने गुन्हा दाखल करून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र, कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेऊन ७ एप्रिलपर्यंत अटकेपून अंतरिम संरक्षण मिळवले होते. या पार्श्वभूमीवर, कुणाल  कामराने आता मुंबई उच्च न्यायालयात मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे.  आपल्यावरील कारवाई ही संविधानाच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, कोणताही व्यवसाय करण्याच्या, जगण्याच्या तसेच वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा कामराने याचिकेत केला आहे. कामराला चौकशीसाठी आतापर्यंत पाच समन्स बजावले असून अद्याप तो मुंबई पोलिसांसमोर हजर झालेला नाही.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ म्हणाले, ७० टक्के कैद्यांवर अद्याप गुन्हे सिद्ध नाही देवी स्क्वेअर सर्कल क्लिनिकच्या अहवालात माहिती

३६ वर्षीय वनिता देवी (नाव बदलले आहे) हिच्यावर २०१७ मध्ये तिच्या तीन आणि सहा वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *