मुंबई : प्रतिनिधी
सलमान खानसोबतच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर तीनशे कोटींहून अधिक गल्ला जमवल्याने कतरीना कैफ पुन्हा एकदा फॅार्ममध्ये आली आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार असल्याने कतरीना सध्या लाइमलाईटमध्ये आहे. मुख्य भूमिकांसोबतच आयटम साँग्जमुळेही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या कतरीनाने ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’साठीही एक स्पेशल साँग केलं आहे.
‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत…’, ‘चिकनी चमेली…’, ‘शीला की जवानी…’, ‘धूम मचाले…’, ‘माशाअल्ला…’, ‘काला चष्मा…’ या गाण्यांमध्ये आपला जलवा दाखवण्यात यशस्वी झालेली कतरीना ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्येही धमाल करताना दिसणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी नृत्य दिग्दर्शक, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवाने केली आहे.
या गाण्यासाठी कतरीनाने खूप मेहनत घेतल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. या गाण्यासाठी तिने पहाडी नृत्यावर आधारित असलेल्या डान्सिंग स्टेप्सचं ट्रेनिंग घेतलं आहे. गाण्याचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी आठवडाभर तिने दररोज पाच तास या गाण्याच्या स्टेप्सचा रियाज केला आहे. हे गाणं उत्तर भारतीय लोकगीतावर आधारित असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या गाण्यात प्रभूदेवाने पहाडी नृत्यशैलीला ग्लॅमर टच देण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यासाठी कतरीनाने केवळ डान्सचं ट्रेनिंग घेतलं नसून डाएटच्या माध्यमातून फिट राहण्याचं आव्हानही तिच्यासमोर होतं. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये उभारण्यात आलेल्या सेटवर या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.
Marathi e-Batmya