सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था (एचआयटीआरआय) आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) यांच्यात धोरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही संस्थांनी वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला.
हाफकिन संस्थेचे संचालक डॉ. सुवर्णा खरात तसेच संस्थेतील अजित जगताप, मृणाल घाग सावंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घानाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सहभाग घेतला. या शिष्टमंडळात सीपीएमआरचे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. अॅलेक्स असासे, उपकार्यकारी संचालक डॉ. जोनास कोफी डॉनकोर, फॉर्माकॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. स्टीफन अँटवी तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फैसल नहू आणि तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग यांचा समावेश होता.
बैठकीत विशेषतः सर्पदंशामुळे होणाऱ्या विषबाधेच्या वाढत्या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली. आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण व वंचित भागांमध्ये सर्पदंश हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला असून त्यावरील स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध उपचारांची गरज अधोरेखित करण्यात आली. दोन्ही संस्थांनी वनस्पतीजन्य औषधांच्या आधारे सर्पदंश व्यवस्थापनासाठी नवीन उपचारपद्धती विकसित करणे, झेब्राफिश आधारित प्रीक्लिनिकल मॉडेल्स तयार करणे, संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे, आंतरराष्ट्रीय संशोधन अनुदानांसाठी प्रस्ताव सादर करणे आणि वैज्ञानिक क्षमतावृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले की, जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक भागीदारीमुळे नवोन्मेषी संशोधनाला चालना मिळेल, वैज्ञानिक क्षमता अधिक बळकट होईल आणि जगभरातील लोकांसाठी उपयुक्त ठरणारे आरोग्यविषयक उपाय विकसित करण्यास मदत होईल.
प्रस्तावित सहकार्याअंतर्गत संशोधक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त अभ्यास, तंत्रज्ञान हस्तांतरण यासंदर्भात संयुक्त प्रस्ताव तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे युवा वैज्ञानिकांना जागतिक दर्जाच्या संशोधन पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
ही बैठक भविष्यातील औपचारिक सहकार्याचा पाया रचणारी ठरली असून भारत आणि घाना या दोन्ही देशांमधील वैज्ञानिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य, जैवविविधतेवर आधारित औषध संशोधन, विषशास्त्र आणि ट्रान्सलेशनल सायन्स या समान प्राधान्यक्रमांद्वारे दोन्ही संस्था नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींचा शोध, संशोधन परिसंस्थेचे बळकटीकरण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांतील आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी संयुक्तपणे कार्य करणार आहे.
हाफकिन संस्था आणि सीपीएमआर यांच्यातील हे सहकार्य भारत-आफ्रिका वैज्ञानिक भागीदारीचे आशादायी उदाहरण ठरणार असून जागतिक आरोग्य संशोधन क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्यास मदत होणार आहे.
Marathi e-Batmya