राज्यातील विधानसभा निवडणूकासाठीची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उलटून गेली. तसेच आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख ४ नोंव्हेबर आहे. मात्र दिवाळी सण आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्त आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज भर दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांच्या प्रचार रॅली दरम्यान त्यांच्यासोबत असलेले शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी एक वक्तव्य केले. त्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी या चांगल्याच भडकल्याचे चित्र पाह्यला मिळालं.
अमिन पटेल यांच्या सोबत अरविंद सावंत हे प्रचाराच्या निमित्ताने फिरत होते. त्यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अरविंद सावंत यांना विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या अनुषंगाने विचारणा केली. त्यावर शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, देखो हम बाहरसे आये इम्पोर्टेड माल का प्रचार नही करते हम अपने माल का प्रचार करते है असे सांगत शिदें गटाच्या शिवसेना उमेदवार शायना एन सी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
त्यावर शिंदे शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी हा एकट्या शायना एनसी यांचा अपमान नाही तर समस्त महिला वर्गाचा अपमान असल्याचे सांगत अरविंद सावंत यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने राज्यात महिला वर्गाला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. तीची पुजा केली जाते मात्र प्रतिस्पर्धी महिलेला माल संबोधून तिचा अपमान करणे चुकीचे असल्याचे सांगत याप्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले.
तर शिंदे शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना शायना एन सी म्हणाल्या की, अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा मी निषेध करते. ते एका महिलेला माल म्हणून म्हणतात. मी त्यांना विचारू इच्छिते की, मुंबा देवीची प्रत्येक महिला माल आहे का, २०१९, २०१४ साली ते मोदीचं नाव लावून निवडणूक जिंकले. आज २०२४ च्या निवडणूकीत ते मला माल म्हणत आहेत. त्यामुळे त्यांची मनस्थिती स्पष्ट होते. त्यांच्या पक्षाचे नेतृत्व का गप्प आहे असा सवाल करत उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी आता बोललं पाहिजे असेही अशी मागणी करत मी कायदेशीर पाऊल उचलेन अथवा नाही, पण एका महिलेला माल म्हणणाऱ्यांचे हाल जनता नक्कीच करेल असा गर्भित इशाराही यावेळी दिला.
पुढे बोलताना शायना एनसी म्हणाल्या की, यापूर्वीच्या निवडणूकीत लाडक्या बहिणीप्रमाणे मी अरविंद सावंत यांचा प्रचार केला. आता तेच अरविंद सावंत महिलेला माल म्हणत आहेत. माल म्हणजे आयटम या शब्दाचा वापर केलात. मतदार तुम्हाला बेहाल करणार, सक्षम महिलेचा सन्मान करू शकत नाही अपशब्द वापरले जात असल्याची टीकाही यावेळी केली.
शायना एन सी यांच्या प्रत्युत्तरानंतर अरविंद सावंत म्हणाले की, माझे वक्तव्य हे हिंदीत आहे. त्या वक्तव्यात शायना एन सी यांचे नाव मी घेतले नाही. तसेच ते वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतलं गेले असल्याची सारवा सारवही यावेळी अरविंद सावंत यांनी केली.
दरम्यान अरविंद सावंत यांच्या वक्तव्याच्या विरोधात मुंबादेवी पोलिस ठाण्यात शायना एन सी यांनी तक्रार दाखल केली.
Marathi e-Batmya