मुंबई : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने अँट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणण्याच्या अनुषंगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्व दलित, मागासवर्गिय, डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंदला मुंबईत थंड प्रतिसाद मिळाला असून दुपारी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पुर्नविचारार्थ सरकारने याचिका दाखल करण्याची मागणी केली.
मुंबई वगळता राज्यातील नागपूर शहरात आणि नंदूरबार जिल्ह्यातील शहादा आणि धडगांव येथे भारत बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र शहादा येथे एस.टी. बसेसवर दगडफेक करत एका एस.टी बसला आंदोलन कर्त्यांनी पेटवून दिले. या घटनेचा अपवाद वगळता राज्याच्या इतर भागातील काही ठिकाणी शांतपणे तर काही ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी शांततेत मोर्चा काढत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पुर्नविचार याचिका दाखल करावी अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, देशातील मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यात भारत बंद यशस्वी होत त्यास हिसंक वळण लागले. अँट्रॉसिटी कायद्याच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने अद्याप कोणतीही हालचाल केली नसल्याच्या निषेधार्थ या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंद यशस्वी करण्यात आला. अनेक ठिकाणी रेल रोको, मोर्चे काढत सर्वोच्च न्यालयालयाच्या निकाला विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
Marathi e-Batmya