विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाकडून मुंबईत आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे सांगण्यात असून मुंबईतील विद्यमान आमदारांपैकी पाच ते सात उमेदवारांचे तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरु आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वतीने प्रसारमाध्यमांवर झळकणारा चेहरा म्हणजे राम कदम. मात्र, सुमार कामगिरीमुळे भाजपा नेतृत्त्वाकडून त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणूकीचे तिकिट कापले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मिहीर कोटे यांना मतांचा कमी लीड मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
२००९ मध्ये राम कदम मनसेकडून निवडणूक लढवून विधानसभेवर गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये राम कदम सहजपणे निवडून आले. दहीहंडी, रक्षाबंधन सोहळा आणि धार्मिक स्थळांच्या यात्रांमुळे राम कदम हे सातत्याने चर्चेत असायचे. मात्र, गेल्या पाच वर्षातली त्यांची कामगिरी सुमार असल्यामुळे भाजपा नेतृत्त्वाकडून राम कदम यांचा पत्ता कट करण्यात येणार असल्याचे भाजपामधील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
कदाचित याची कुणकुण राम कदम यांना लागल्याने नेहमीच सक्रिय असलेले राम कदम मागील काही दिवसांपासून मतदारसंघात सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र, आता त्याचे खरे कारण समोर येताना दिसत आहे. राम कदम यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यास घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राम कदम यांच्यासह आणखी पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये वर्सोवा मधून विद्यमान आमदार भारती लव्हेकर, तर सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन, घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा तर बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांना उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरु झाली आहे.
Marathi e-Batmya