दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सरकारी पोलिसी वाहनातून रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोप राज्यातील महायुती सरकारवर केला. त्यासंदर्भात आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितले की, त्या आरोपानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व वाहने तपासण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांपर्यंत एबी फॉर्म पोहोचविण्यासाठी शासकिय विमान- हेलिकॉप्टरचा वापर केल्याबाबत निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम म्हणाले की, संबधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या खर्चात तो खर्च दाखविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटची मुदत संपल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोखलिंगम यांनी आज मंत्रालयातील वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
यावेळी बोलताना एस चोकलिंगम यांना रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत विचारले असता एस चोकलिंगम म्हणाले की, कोणत्या पदावर कोण राहणार किंवा बसणार हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच पुढे बोलताना निवडणूक मुख्याधिकारी म्हणाले की, राज्यातील निवडणूका पारदर्शक ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या जाणार आहेत. तसेच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कोणाचेही वाहन असो ते वाहन तपासण्याचे आदेश देण्यात आले आहे. निवडणूक आचटारसंहितेततून फक्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सूट देण्यात आली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती किंवा अति महत्वाच्या राजकीय नेत्यांना ही सूट देण्यात आली नसल्याचे सांगत त्यांच्यापैकी कोणाच्याही गाड्याची तपासणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला- पोलिस यंत्रणांना असल्याचेही यावेळी सांगितले.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक मुख्याधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी लेव्हल प्लेईंग फिल्डचा उल्लेख सातत्याने करत आहेत. त्या धर्तीवर राज्यात तशी परिस्थिती आहे का असा सावल केला असता मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले की, मागील १०-१२ दिवसात तरी असलेल्या वातावरणामुळे आम्ही सर्वांना समान संधी देत असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya