मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल ‘मुंबई टेक विक 2026’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची  तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. ‍‍

मुंबईतील बीकेसी येथे ‘मुंबई टेक विक २०२६’ चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिले. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे, महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, तसेच प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने १० हजार कोटी रुपयांची एआय गुंतवणूक, दीड लाख रोजगार निर्मिती, सहा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एआय क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य सरकार ‘कम्प्युट-अ‍ॅज-अ-सर्व्हिस’ सुविधा निर्माण करत आहे. त्याद्वारे नवउद्योजक आणि संशोधकांना २ हजार जीपीयू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उच्च क्षमतेच्या कम्प्युटिंग सुविधा परवडत नसल्यास नवकल्पना थांबते. त्यामुळे महाराष्ट्र शासन थेट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सरकार फक्त धोरणात्मक चौकट तयार करू शकते; पण खरी स्टार्टअप परिसंस्था संस्थापक आणि उद्योजक घडवतात. डिसेंबर २०२२ मध्ये टेक उद्योजकांच्या संघटनेची संकल्पना प्रथम मांडण्यात आली होती, त्यावेळीच त्यांच्या कामातील ऊर्जा आणि दृष्टी पाहून हा उपक्रम मोठा होईल, असा विश्वास वाटला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता प्रत्येक वर्षी अधिकाधिक संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्या महाराष्ट्राशी जोडल्या जात आहेत. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरले आहे, असेही सांगितले.

देशभरातून आणि विदेशातून मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन केले. आणि ते म्हणाले “तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे आणि महाराष्ट्र ही सर्वोत्तम कार्यभूमी आहे. येथे आधीच सक्षम परिसंस्था तयार झाली आहे. महाराष्ट्रासाठी काम करा, भारतासाठी काम करा आणि जगासाठी नवकल्पना घडवा.”

राज्य शासन केवळ इनक्युबेशन आणि अ‍ॅक्सेलरेशनपुरते मर्यादित नसून ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्या सोबत उभे राहण्यास तयार आहे, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआयच्या वाढत्या वापराची उदाहरणे देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महा-विस्तार’ या शेतकरी अ‍ॅपचा विशेष उल्लेख केला. हे शेतकऱ्यांसाठी एक ‘वन स्टॉप सोल्युशन’ आहे. भारत एआय परिषदेत केंद्र सरकारने त्याला देशातील सर्वोत्तम शेतकरी उपाय म्हणून गौरविले आहे. आता ‘इंडिया-विस्तार’ संकल्पना त्याच धर्तीवर विकसित होत आहे. तसेच बांधकाम परवानगी प्रक्रियेत एआय आधारित प्रणालीमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार असल्याचे सांगितले.

गुन्हे तपास आणि न्यायप्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘क्राईम ओएस’ प्लॅटफॉर्मचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रणालीमुळे तपास, चार्जशीट तयार करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेगवान होणार आहे. पूर्वी १५ हजार पानांच्या आरोपपत्रासाठी तीन-चार महिने लागत; आता एआयमुळे ते दहा-बारा दिवसांत शक्य होणार आहे.

वैद्यकीय विमा योजनांतील गैरव्यवहार शोधणे, एचआर स्टॅकद्वारे शासकीय मनुष्यबळ व्यवस्थापन सुधारणे, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि निगराणी व्यवस्था यांसारख्या क्षेत्रांतही एआयचा प्रभावी वापर सुरू आहे. राज्य सरकारने विविध विभागांसाठी ५० एआय इंजिन विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

एआयच्या वेगवान विस्तारासोबत निर्माण होणाऱ्या ‘डीपफेक’, डेटा सुरक्षा आणि विश्वासार्हतेच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “एथिकल एआय” हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. एआय सर्वांसाठी उपलब्ध असला पाहिजे. तो केवळ मोठ्या कंपन्यांचा विशेषाधिकार राहता कामा नये. एमएसएमईंनाही त्याचा लाभ मिळायला हवा, तसेच एआयमध्ये मानवी हस्तक्षेप आणि मानवी मूल्ये केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. असेही प्रतिपादन मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी केले.

About Editor

Check Also

डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून जमीन देण्यास मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागांव-सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून चार एकर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *