पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन, एकल प्लास्टिकचा वापर टाळा प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे एकल प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. वसुंधरेच्या संरक्षणासाठी पर्यावरण विभागाने पाऊले उचलली असून नागरिकांनी एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गिरगाव चौपाटी येथे एकल प्लास्टिक निर्मूलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे व कदम यांनी गिरगाव चौपाटीची पाहणी करून या ठिकाणी कशा प्रकारे स्वच्छता केली जाते याची माहिती घेतली. तसेच त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छताही केली. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने राज्यात २२ मे पासून एकल वापर प्लास्टिक मुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. एकल वापर प्लास्टिकला नाही म्हणायचे असून त्याचा वापर पूर्णपणे बंद करायचे आहे. त्या प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करायचा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध ट्रस्टचा सहभाग घेत आहोत. विविध धार्मिक स्थळ, रुग्णालये, औषधांची दुकाने आदी विविध ठिकाणी प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करत आहोत.

झाडे लावून ती जतन करा, प्लास्टिकचा वापर करणे टाळा, पाण्याची बचत करा, सौरऊर्जा, सायकल वापरणे यासारख्या पर्यावरणपूरक पर्यायांची निवड करा, कापडी पिशव्या वापरा याबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमात विविध संस्थांनी पथनाट्याद्वारे एकल वापराच्या प्लास्टिक बंदीसंदर्भात जनजागृती केली. यावेळी मुक्ताई घनकचरा व्यवस्थापन सेवा संस्था या संस्थेचे सदस्य तसेच जोशी-बेडेकर महाविद्यालयासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकल वापराच्या प्लास्टिकविरुद्ध घोषवाक्याद्वारे जनजागृती केली व चौपाटीतील कचरा स्वच्छ करून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *