मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हटणार नाही आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात

पोलिसांनी मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाला आझाद मैदानावर आंदोलन करण्यास एक दिवसाची परवानगी दिली. त्यानंतर आज सकाळी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. त्यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या मराठा आरक्षण समर्थक आंदोलनकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. पण सरकार जर त्याचे राजकारण करणार असेल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरीमी मागे हटणार नाही. जेलमध्ये घातलं तर मी जेलमध्येही उपोषण करेन पण मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे मन जिंकायची ही आयती संधी आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नये असा इशाराही यावेळी दिला.

मनोज जरांगे- पाटील यांनी २७ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून हजारो समर्थकांसह आपल्या मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने कूच केली. जालना, बीड, अहिल्यानगर, शिवनेरी किल्ला, चाकण, तळेगाव, खोपोली, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे मनोज जरांगे पाटील  यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आझाद मैदानावर पोहोचला. दरम्यान ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना शांततेचे आवाहन करत काही सूचना केल्या. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्य सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे. आता आपणही सरकारला सहकार्य करावे. समाजाला खाली मान घालावी लागेल, असे वागू नका. मी समाजासाठी मैदानात आलो आहे, तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडायची आहे. आपल्याला आपल्या लेकरा-बाळांना मोठे करायचे आहे. माझा शब्द खाली पडू देऊ नका, असे आवाहनही यावेळी केले.

यावेळी आझाद मैदानावरील उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गणेश आरती करुन मनोज जरागें पाटील यांनी त्यांच्या बेमुदत उपोषणास सुरुवात केली.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचे आदोंलन सुरु केल्यानंतर आंदोलना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंखे, शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे, निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर, अभिजित पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या आमदार खासदारांनी आंदोलनस्थळी भेट घेत आपला पाठिंबा जाहिर केला.

मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार त्यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. मात्र प्रत्यक्षात आझाद मैदानावर ६ ते ७ हजार लोकांना बसण्याची जागा असल्याने बाकी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच मुंबई महापालिके बाहेरील चौकात ठिय्या मांडला. त्यानंतर हुतात्मा चौक, गेट वे ऑफ इंडिया, चर्चगेट, मंत्रालय, मरीन ड्राईव्ह परिसरात हे आंदोलक मोठ्या जमावाने फिरत राहिले. तर मंत्रालय, हुतात्मा चौकात या आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी समजावल्यानंतर या आंदोलकांनी आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेतल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाह्यला मिळाले.

About Editor

Check Also

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *