काँग्रेसच्या विजयानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आमचं कोणीच… असं समजणाऱ्यांचा पराभव उगाच आता कोणाला धडे शिकवू नका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांची फौज तळ ठोकून होती. तसेच भाजपाला निर्विवाद बहुमत मिळणार, नाही मिळाले तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याच्याही वल्गना करण्यात येत होत्या. मात्र जनतेने या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता काँग्रेसच्या पारड्यात मतांचे दान भरभरून टाकत एकहाती सत्ता सुपुर्द केली. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज अंबरनाथच्या दौऱ्यावर आल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कर्नाटकच्या निकालाबाबत राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, कर्नाटकातील विजय हे काँग्रेसचं यश असून आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मागे एकदा मी माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका, हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा, असा उपरोधिक टोलाही भाजपाला लगावला.

पहाटेचा शपथविधी हा ठाकरे गटाला दणका होता. ठाकरे गटाला धडा शिकवण्यासाठी हा शपथविधी करण्यात आला होता, असं भाजपा नेते तथा विद्यमान राज्य मंत्रिमंडळातील सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच एका वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत विधान केले. त्याबाबत विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कुणाला धडे शिकवू नका. तुम्ही या गोष्टी केल्या. त्यानंतर महाराष्ट्राचं हे राजकारण झालं. उगाच सारवासारव करू नका, अशा शब्दात मुनगंटीवार यांना फटकारलं.

कर्नाटकाचा निकाल हे महाराष्ट्रातही बदलाचे संकेत आहेत, असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं नाही. लगेच काय सांगू शकणार? आता कर्नाटकाचा निकाल लागला आहे. पुढे काय आणि कसं कसं घडतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या निकालावरून आताच महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही, असेही स्पष्ट केले.

तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटक निवडणूकीत परिणाम झाला का असा सवाल करता राज ठाकरे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकच्या विजयात स्पष्ट झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे, असे सांगत राहुल गांधींच्या यात्रेचं कौतुक केले आहे. दरम्यान, पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय? असा प्रतिसवालही केला.

About Editor

Check Also

मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात आश्वासन

विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *