माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक सध्या अंतरिम वैद्यकीय जामीनावर बाहेर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने ते सध्या कोणत्याही आडकाठीविना प्रचारात व्यग्र असल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरूवारी दखल घेतली. मलिक यांनी नियमित जामीनासाठी काही महिन्यांपूर्वी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आणि गुणवत्तेच्या आधारे त्यावर निर्णय देण्याचे स्पष्ट केले.
नवाब मलिक यांनी अंतरिम वैद्यकीय जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले असून त्यांचा जामीन रद्द करावा या मागणीसाठी सॅमसन पाठारे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच, अंतरिम जामिनाच्या स्वरूपात मिळालेल्या स्वातंत्र्याचा मलिक यांच्याकडून गैरवापर होत आहे. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने ते साक्षीदारांना प्रभावित करत असल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला होता. न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, मलिक यांना मूत्रपिंडावरील उपचारासाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही आणि त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही. याउलट, नवाब मलिक यांनी वैद्यकीय जामीनासाठी न्यायालयाची दिशाभूल केल्याचेही याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
नवाब मलिकांवरील आरोप गंभीर असून त्याबाबतच्या ठोस पुरावे आहेत का?, अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्यांकडे केली, त्यावर, आरोप सिद्ध करणारे व्हिडिओ आणि छायाचित्रे सादर करण्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तथापि, नवाब मलिक यांच्या नियमित जामिनासाठीच्या याचिकेवर गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, स्पष्ट करून याचिकाकर्त्याने आरोपाचे समर्थन करणारी पुरावे सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
Marathi e-Batmya