Breaking News

पियुष गोयल यांची ग्वाही, उत्तर मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांची कामे… कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार

मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली.

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आ. योगेश सागर, आ.मनीषा चौधरी, आ.सुनील राणे, भाजपा प्रदेश प्रवक्ता गणेश खणकर, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

पियुष गोयल पुढे बोलताना म्हणाले की, या बैठकीमध्ये कांदिवली येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या २०-२५ वर्षांपासून रखडलेल्या या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा मार्ग आजच्या बैठकीनंतर मोकळा झाला आहे. याठिकाणी भविष्यात आशियाई, राष्ट्रीय, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू प्रशिक्षित केले जातील. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे मुंबईकरांचे जीवन सुखकर होणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पियुष गोयल म्हणाले की, उत्तर मुंबई आणि उर्वरित मुंबईमध्ये अर्धवट आणि रखडलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून युद्धस्तरावर काम करत आहे. बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल यांच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तृत चर्चा करून त्याबाबत अहवाल लवकरच सादर करून तेथे क्रीडा सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी असे प्रकल्प महत्वाचे असून ते पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे सुरू असल्याचेही यावेळी सांगितले.

कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या दोन महिन्यांत आणि शिंपोली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या ६-८ महिन्यांत सेवेत रुजू होईल अशी ग्वाहीही यावेळी पियुष गोयल यांनी दिली.

पुढे पियुष गोयल म्हणाले की, या बहुविद्याशाखीय केंद्रांमुळे पालघरपर्यंतच्या रहिवाशांना लाभ होणार आहे. मुबईकरांची वाहतुकीची समस्या सोडवून जीवन सुखकर करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. आकुर्ली पश्चिम द्रूतगती मार्गावरील अंडरपासचे काम रखडले होते त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र बैठकीमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ते काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी टाटा कंपनीला वाहतूक व्यवस्थापन आराखडा बनवण्याची विनंती केली असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना पियुष गोयल म्हणाले की, सह पोलीस आयुक्तांशी चर्चा करून वाहतूक कोंडी होणा-या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याची विनंती करून एक सर्वसमावेशक योजना तातडीने आखली जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्याच्या दिशेने रखडलेल्या गृह आणि पुनर्विकास प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एसआरए) नोडल एजन्सी म्हणून नियंत्रण ठेवून कामे पूर्ण करून घेणार असून पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मां के नाम’ या योजनेनुसार उत्तर मुंबईमध्ये मुंबई महानगर पालिकेतर्फे एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

Check Also

ठाणे मध्ये विविध समाजासाठी एकाच इमारतीत १२ समाज भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण,भूमीपूजन

एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *