Breaking News

अजित पवार यांचे आवाहन…विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचू नका कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही...

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक गरवारे क्लब हाऊस येथील शरद पवार विंगच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यावेळी मनोधैर्य वाढवले. येत्या विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन असून यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवविले जातील. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय हे महायुती सरकारच्या काळात घेतले आहेत. शिव – फुले – शाहू – आंबेडकरांची विचारधारा ही आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही, अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट केली.

येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वांसाठी महत्त्वाची असून त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार देशभरात करायचा असल्याचा निर्धार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यावर महाराष्ट्राची जनता १०० टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

यावेळी सुनिल तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात वैचारिक पातळी खालावलेली दिसली. मात्र, प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणाविषयी टीकाटिप्पणी करताना मर्यादा ओलांडली नाही, याचा तटकरे यांनी आवर्जून उल्लेख करतानाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार आहोत याचा अभिमान असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, येत्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, त्यादृष्टीने आपल्याला आता संघटनात्मक बांधणी करायची आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ ही भूमिका घेऊन आजपासून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन करतानाच आपल्याला अपेक्षित असलेले यश निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

पावसाळी अधिवेशनापूर्वी जिल्हास्तरावर विभागीय मेळावे घेणार असल्याचे सांगतानाच १० जून रोजी पक्षाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *