छगन भुजबळ यांचा इशारा, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही आगामी विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही असे इशारा राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणे गरजेचे आहे. जे कां रंजले गांजले । त्यासी ह्मणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ असा उपदेश देणार तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. त्यांची शिकवण देणे आवश्यक आहे असल्याचे सांगत
‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे”! असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे असेही यावेळी सांगितले.

छगन भुजबळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पार हा नारा दिल्यानंतर देशांमध्ये संविधान बदलले जाणार असा प्रचार विरोधकांनी केला आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसु शकतो याचा विचार आपण करायला हवा अशी भूमिकाही यावेळी मांडली.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी ८०-९० जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी केली. आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर ८०-९० जागा मिळाल्या तर ५०-६० निवडून येतील. आता ५० आहेत म्हणजे आम्ही ५० जागा घेऊ असे होणार नाही. आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून अशी मागणीही यावेळी अजित पवारांकडे केली.

छगन भुजबळ म्हणाले की, नुकत्याच राज्यात लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आता आगामी काळात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आचारसंहिता लागेल या काळामध्ये सर्व आमदारांच्या मतदारसंघातील कामे खोळंबता कामा नये यासाठी आपण अगोदरच निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करावा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांची माहिती, पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना ई-रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *