नवीन कुमार
महाराष्ट्र भाजपाचा विरोध असतानाही अजित पवार आता दिल्लीतील भाजपा नेत्यांशी नवाब मलिक प्रकरणी आणि उमेदवारी देण्याबाबत शिष्टाई करणार असल्याची माहिती पुढे येत असून नवाब मलिक यांच्या प्रकरणात ज्युनियर पवार झुकणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अधिकृत सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार नवाब मलिक यांना उमेदवारी देण्याबरोबर नवाब मलिक यांची कन्या सना मलिक-शेख यांना आणि दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीही यांनाही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली जाणार आहे. यापैकी नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या उमेदवारीवर भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच अडकलेल्या १८ जागांमध्ये या उमेदवारांना देण्यात येणाऱ्या जागांचा समावेश असल्याने अजित पवार दिल्लीतील भाजपा नेत्यांसोबत शिष्टाई करणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत (अजित गट) हसन मुश्रीफ हे कागलमधून आणि नजीब मुल्ला हे मुंब्रा-कळव्यातील दोन मुस्लिम उमेदवार आहेत. सना मलिक-शेख ला एबी फॉर्म देण्यात आला आहे. मात्र भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधानंतर नवाब मलिक आणि सना मलिक यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून ते अजित पवार गटात आहेत.
नवाब मलिक यांच्या विरोधात सर्वप्रथम भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस उभे राहिले. नवाब मलिक यांचे देशद्रोही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा त्यांचा आरोप आहे. नवाब मलिक यांच्या विरोधातील आपला निषेध व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांचा महाआघाडीत समावेश करू नये, अशी विनंती केली होती.
एनआयएने एका प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली होती. मात्र सध्या मलिक प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर तुरुंगातून बाहेर आहेत. नवाब मलिक यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे. ज्युनियर पवार अजित पवार यांनी त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे. एका कार्यक्रमात अजित पवार यांनी नवाब मलिक यांची कन्या सना मलिक-शेख हिची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्येपदी नियुक्तीची घोषणा केली होती.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांनी विधानसभेच्या अधिवेशनातही आमदार म्हणून भाग घेतला होता आणि ते राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत सभागृहात बसले होते. तसेच नवाब मलिक त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही कार्यरत आहेत. त्यांची मुलगी सना ही माजी नगरसेवक आणि समाज कार्यात कार्यरत आहे. नवाब मलिक हे अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ही जागा ते आपल्या मुलीसाठी सोडून मानखुर्द-शिवाजीनगरमधून निवडणूक लढवू इच्छितात.
दुसरीकडे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत (अजित गट) आलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या हत्येत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचाही हात असल्याचे बोलले जात आहे. बाबा सिद्धीकी यांच्यासोबत त्यांचा मुलगा काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकी यानेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात असून झिशान अजित पवार यांच्यासोबत असून त्यास वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिकीट हवे आहे.
लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर अजित पवार यांनी १० टक्के मुस्लिमांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. मात्र हिंदू विचारधारेचे पालन करणाऱ्या भाजपाला ही घोषणा आवडली नाही. त्यामुळे मुस्लिमांना तिकीट देऊ नये यासाठी भाजपा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकत आहे. पण महाविकास आघाडीला जास्त जागा देणारा मुस्लिम या विधानसभा निवडणुकीत अलिप्त राहू शकत नाही हे अजित पवार यांना माहीत आहे. त्यामुळे विजयाची पूर्ण शक्यता असलेल्या मुस्लिम उमेदवारांवर राष्ट्रवादी बाजी मारत आहे. दिल्लीतील रखडलेले प्रश्न मार्गी लागतील आणि पुढील यादीत मलिकसह अन्य मुस्लिम उमेदवारांची नावे येतील अशी शक्यता व्यक्त करत झिशान सिद्धीकी आणि नवाब मलिक- सना मलिक-शेख यांच्या उमेदवारीची लवकरच होईल अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी वर्तविली.
Marathi e-Batmya