Breaking News

अलका लांबा यांचा उपरोधिक टोला, महागाईने सण उत्सवाचा रंग फिका… महिला काँग्रेस महागाईविरोधात २८८ मतदारसंघात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार

सणासुदीचे दिवस असूनही महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, भाज्या, धान्य सर्वांच्याच किंमती प्रचंड वाढल्या आहेत, घर चालवणे गृहिणींना कठीण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन भाजपा महिलांची फसवणूक करते. महागाईमुळे सण, उत्सावाचा रंग फिका पडला आहे. या महागाईने जनता त्रस्त आहे म्हणून भाजपा सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार आहे, अशी माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अलका लांबा यांनी भाजपा सरकारवर तोफ डागत म्हणाल्या की, सत्तेत आल्यास प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यात वर्षाला १ लाख रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार आले नाही. तेलंगणात सरकार आल्यानंतर तेथे दर महिन्याला २५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत, कर्नाटकात २००० रुपये तर हिमाचल प्रदेशमध्ये १५०० रुपये दिले जातात. काँग्रेसचे सरकार येताच महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु केली पण महाराष्ट्रात मात्र भाजपा युती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे, ही योजना महिलांची फसवणूक करणारी आहे, या योजनेला भ्रष्टाचाराची किड लागली आहे. बँक खात्यावर पैसे शिल्लक नसल्याचे कारण देत अनेक महिलांच्या खात्यातून बँकांनी पैसे काढून घेतले आहेत. एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज करुन पैसे लाटले. या योजनेच्या जाहीरातबाजीवर सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे.

पुढे बोलताना अलका लांबा म्हणा्या की, महागाईप्रश्नी भाजपा सरकारला जाग आणण्यासाठी रिकामी थाळी वाजवून ‘खर्चे पे चर्चा’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान २८८ मतदारसंघातील सर्व गाव तालुक्यात केले जाणार असून आज मुंबईतील वर्सोवा व चेंबूर विधानसभा मतदारसंघातून याची सुरुवात केली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सध्या महागाई व महिला सुरक्षा हे मुद्दे अत्यंत महत्वाचे असून महागाईने महिलांना घर चालवणे अवघड झाले आहे तर महिला सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. भाजपा सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत. भाजपा सरकारच्या विरोधात महिला काँग्रेस आवाज उठवेल व खर्चे पे चर्चा अभियान घरोघरी पोहचवतील, असा विश्वास व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिषा बागुल, भावना जैन यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्री पदा पेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा… मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’

मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *