आनंदराज आंबेडकर यांची एकनाथ शिंदे युती दुर्दैवीः वंचित बहुजन आघाडीने केला निषेध वंचित बहुजन आघाडीने तातडीची बैठक घेत संविधानाला न मानणाऱ्यांबरोबर केली युती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेनाओएफसी आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्या आज युती झाल्याची घोषणा केली. त्यावर वंचित बहुजन आघाडीने तातडीने पक्षाची ऑनलाईन बैठक घेत या युतीचा निषेध करत ही युती दुर्दैवी असल्याचे मतही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत करण्यात आले.

आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची एक ऑनलाईन बैठक तातडीने घेण्यात आली आणि त्या बैठकीत या युतीचा निषेध करत त्याविषयीचे वंचित बहुजन आघाडीकडून जाहिर निवेदनाची पत्रकही जारी करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज १६ जुलै रोजी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युतीची घोषणा केली. आम्ही ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य बाब मानतो. गेल्या ७० वर्षाच्या राजकारणात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधानाला न मानणारे आणि आता संविधान बदलणारे आरएसएस-बीजेपी यांच्याबरोबर कधीही युती केली नाही. याचे कारण बीजेपी – आरएसएस हे संतांचा हिंदू धर्म मानत नाही, तर सनातन वैदिक धर्म मानतात. फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही समता, स्वातंत्र्य, बंधुता यावर आधारित संतांच्या विचारांची पाईक आहे. हे दोन्हीही दोन विरुद्ध टोक आहेत.

पुढे युतीसंदर्भात बोलताना वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतल्या जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही संविधान बदलणाऱ्या आरएसएस- बीजेपी यांची समर्थक झाली आहे. आत्तापर्यंत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला व त्यांच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला आहे की यापुढे आनंदराज आंबेडकर यांना व त्यांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

शेवटी जाहिर निवेदनात वंचित बहुजन आघाडीने जाहिर केले की, ज्या-ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या बीजेपी-आरएसएस व त्यांच्या मित्रांबरोबर समझोता करतील ते फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार. तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीला आम्ही आवाहन करतो, आनंदराज आंबेडकर की संविधान? याबाबतीत वंचित बहुजन आघाडीचा निर्णय हा संविधानाच्या बाजूने आहे. फुले शाहू आंबेडकरी जनतेने आपला निर्णय घ्यावा असे आवाहनही यावेळी केले.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तातडीने बोलाविण्यात आलेल्या बैठकीला अॅड. प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष), रेखाताई ठाकूर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष), अॅड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अशोकभाऊ सोनोने, डॉ. अरुण सावंत, डॉ. अनिल जाधव, अॅड. अरुण जाधव, डॉ. अरुंधती शिरसाठ, अमित भुईगळ, सर्वजित बनसोडे, अविनाश भोसीकर, दिशा पिंकी शेख, फारुख अहमद, अॅड. गोविंद दळवी, प्रा. किसन चव्हाण, कुशल मेश्राम, महेश भारतीय, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ. निलेश विश्वकर्मा, प्रा. हमराज उईके, प्रा. सोमनाथ साळुंखे, सविता मुंढे, प्रा. विष्णू जाधव, सिद्धार्थ मोकळे, जितरत्न पटाईत आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *