Breaking News

अतुल लोंढे यांचा इशारा, MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी, तारखा बदला अन्यथा… MPSC च्या आडमुठ्या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे. १८ व २५ ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. MPSC एमपीएससीने परिक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन दोन तीन दिवसांनी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला.

टिळक भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्य आयोग परिक्षांच्या तारखा ठरवताना UPSC/IBPS/ Staff Selection commission च्या परिक्षांच्या तारख्यांचा अंदाज घेऊन ओव्हरलॅप होणार नाहीत अशा पद्धतीने तारखा ठरवण्याचा प्रघात चालत आला आहे. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतल्याचे यावेळी तरी दिसत नाही. एमपीएससी विद्यार्थ्यांवर सुड उगवण्याचे काम करत आहे. एकतर जागा निघत नाहीत आणि जागा निघल्या तर त्याचे नियोजन व्यवस्थित नसते. परीक्षा फक्त रविवारीच घ्यावी असा काही नियम नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून परिक्षांच्या तारखा ओव्हरलॅप होत असल्याचे दिसताच विद्यार्थ्यांचे हित पाहून आयोगाच्या परिक्षांची तारीख बदलण्याचे निर्देश दिले. जे कर्नाटक सरकार करू शकते ते महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही. सर्वसामान्यांचे सरकार आहे असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाकाखाली एमपीएससी मनमानी कारभार करते त्यात लक्ष घालगण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, अॅग्रीकल्चर संवर्गातील २०२ जागांवर विद्यार्थ्यांची निवड झाली असताना अद्याप त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत, त्याच कृषी संवर्गातील २५८ जागांची मागणी सरकारने एमपीएससीकडे केलेली आहे, पण एमपीएससीने त्या संवर्गाची लिंकच ओपन केलेली नाही, त्यामुळे २५ तारखेला जी परिक्षा होत आहे ती होऊ नये अशी आमची मागणी आहे. ती लिंक ओपन करण्यासंर्भात एमपीएससीकडून काहीही हालचाल होत नाही आणि मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस या प्रकरणी लक्ष घालण्यास तयार नाहीत असा आरोपही यावेळी केला.

अतुल लोंढे पुढे बोलताना म्हणाले की, एमपीएससीचे अधिकारी अत्यंत मग्रूर आहेत, विद्यार्थ्यांच्या हिताशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. एमपीएसी परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत, त्यांची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. एमपीएससी आडमुठी भूमिका घेऊन त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करण्याचे पाप करत आहे. आयोगाच्या या भोंगळ कारभाराला विद्यार्थी कंटाळले आहेत, त्यांना नैराश्य आले असून ते प्रचंड मानसिक तणावात आहेत. सरकारने लाडकी बहिण योजना काढली आहे तशीच लाडका भाचा स्पर्धा परिक्षा योजनाही काढावी, असा टोलाही यावेळी लगावला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *