Breaking News

बाळासाहेब थोरात यांचा आरोप, भ्रष्ट मार्गाने बनलेल्या सरकारचा कारभारही भ्रष्टच शिंदे सरकारने ‘लाडका मित्र’ योजनेतून अदानीला मुंबईतील किती कंत्राटे दिली – खासदार वर्षा गायकवाड

मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीमध्ये मागील दोन वर्षात प्रचंड वाढली असून अमली पदार्थांचा काळाधंदाही फोफावला आहे. ड्रग्जच्या धंद्यामागे कोण आहेत त्याच्या मुळाशी जाऊन रॅकेट उद्ध्वस्थ केले पाहिजे. महायुती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पहिल्यात पावसात मुंबईतील रस्त्यांची अवस्था वाईट झाली, नालेसफाईच्या कामातही प्रचंड भ्रष्टाचार झाला. आमदारांच्या किमती ठरवून घोडेबाजार बनवला आहे. भ्रष्ट मार्गाने बनलेल्या महायुती सरकारचा कारभारही भ्रष्टच असून लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत महायुतीला त्याची किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसने ‘महायुतीचे पापपत्र’ जाहीर केल्यानंतर बोलताना म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळात महागाई प्रंचड वाढली. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तू यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मध्यमवर्गीय समाजाचे बजेट कोलमडले आहे. जीएसटीचा भार गरिबांवरच जास्त आहे. हिऱ्यावर १.५ टक्के जीएसटी तर स्कूटरवर १८ टक्के जीएसटी आहे. सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी उभा आहे.

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई काँग्रेसने शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात पापपत्र जनतेसमोर मांडले आहे. मुंबईच्या साधनसंपत्तीची लूट, फसवणूक सुरु असून मुंबईच्या जमिनी मित्रांना दान दिल्या जात आहेत, उद्योग मुंबईबाहेर पळवले आहेत. हे आरोपपत्र आम्ही जनतेच्या न्यायालयात सादर केले आहे. सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल. या सरकारच्या पापांचा घडा भरला आहे. यांनी मुंबईवर फक्त अन्यायच केला आहे. मुंबईची अस्मिता, ओळख आणि बंधुभाव मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. शिंदे-फडणवीस-पवार यांच्या ट्रबल इंजिन सरकारच्या पापाचे पत्रक जनतेच्या दरबारात आम्ही मांडत आहोत आता जनताच त्यांना शिक्षा देईल, असा इशाराही यावेळी दिला.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून लाडका मित्र योजना सुरु झाली असून या लाडक्या मित्रासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्पातील नियम, अटी शिथिल करण्यात आल्या. धारावीनंतर मदर डेअरीची जागा दिली जात आहे. मिठागराची जमीन, मोतीलाल नगर या सर्व जमिनी लाडका मित्र अदानीला देण्याचे काम शिंदे सरकार आल्यापासून सुरु आहे. बेस्ट च्या वीजेचा दर सर्वात कमी आहे, ते कामही आता अदानीला दिले जात आहे. रस्त्याच्या क्रांकीटकरणाचे कामही त्यांनाच दिले. शिंदे सरकारने आपल्या लाडक्या मित्राला किती कंत्राटे दिली, असा सवाल विचारून धारावी प्रकल्पाचे रिटेंडरिंग झाले पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, माजी आमदार मधू चव्हाण, प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, खजिनदार संदीप शुक्ला, आनंद शुक्ला,अखिलेश यादव,आदी उपस्थित होते.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *