राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांकडून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचारकांची धावपळ सुरु आहे. निवडणूका म्हटलं की प्रत्यारोप हे आलेच. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल रात्री अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावी प्रचारासाठी गेलेल्या भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा या भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचारसभेत भाषण करत असताना काही जणांनी नवनीत राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली.
या घटनेनंतर नवनीत राणा यांनी सभेत नेमकं काय घडलं होतं याविषयी सांगत गोंधळ घालणाऱ्यांना इशारा देत गंभीर आरोप केले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, काल सभेनंतर माझ्यावर खुर्च्या फेकण्यात आल्या. माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप गोंधळ घालणाऱ्यांवर करण्यात आला.
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, कालच्या सभेत २०० ते २५० अपंग लोक बसले होते. ते सर्व मला भेटण्यासाठी आले होते. सभेत भाषण करताना काहींनी वक्तव्य केले. त्यावेळी एवढ्या लांबून अल्ला हू अकबरचे नारे ऐकायला येत होते. त्यावेळी माझे काही कार्यकर्त्ये तेथे होते. त्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच शांततेत सभा करून जाणार आहोत. असं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. सभा संपल्यानंतर मी लोकांशी संवाद साधत होते, लोकांना भेटत होते. तेव्हा मला काही लोकांनी तुला मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी देण्यात आली. तरीही मी म्हटलं शांतता राखा. त्यावर काही जणांनी लगेच तेथील खुर्च्या उचलल्या आणि आमच्या लोकांवर फेकल्या. त्यानंतर काही लोकांनी मला गाडीत बसवलं, मी नसते तर खल्लार गावातील दोन लोकांचा जीव त्या लोकांनी घेतला असता असा गंभीर आरोपही यावेळी केला.
नवनीत राणा पुढे बोलताना म्हणाल्या की, एवढंच नाहीतर माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. तसेच माझ्याबरोबर असलेल्या महिला सुरक्षा रक्षकांनाही काही खुर्च्या लागल्या. या सर्व प्रकरणावरून हे लक्षात येतं की, जे व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढत आहेत. जो विचार घेऊन चाललो आहोत. आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन जाणारे आणि संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. जर त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमची ही भाषा त्याच पद्धतीची असेल आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी दिला. ज्या गावात हा प्रकार घडला, ते गावं शिवसेना उबाठा पक्षाच्या तालुका अध्यक्षाचं आहे. आधी व्यासपीठावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही सभेसाठी व्यासपीठ उभे केले. त्यानंतर सभेला यायला उशीर झाला. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सभेसाठी आलेल्या महिला आणि लोकांबाबत अपशब्द बोलत होते. अशा पद्धतीचा व्यवहार केला. हे स्पष्ट आहे की, ज्यांचे तालुकाध्यक्ष आहेत. आणि आज उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही तर जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत. तसेच काहींची एवढी हिंमत वाढली की, लोकांना मारणं आणि मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अमरावतीत घडत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
दरम्यान याप्रकरणी नवनीत राणा यांनी चार जणांचे नाव घेत अन्य लोकांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून झाल्या प्रकाराचे व्हिडिओ फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. तसेच व्हिडिओ फुटेजमधील चेहऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
तसेच दर्यापूरचे पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की, त्यांच्या सभेबाबत काही लोकांनी आक्षेप घेतला. मात्र आक्षेप घेणाऱ्या नागरिकांनाच त्यांच्या समर्थकांन विरोध दर्शविला. त्यातून आक्षेप घेणारे आणि समर्थक यांच्यात वादावादी झाली. ही घटना १६ नोव्हेंबरच्या रात्री घडली.
दरम्यान, नवनीत राणा यांनी गुन्हा दाखल केला असून तातडीने पोलिसी कारवाई सुरु केली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून गोंधळ घालणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असून झालेल्या प्रकरणाची व्हिरिफिकेशन करण्यात येत आहे.
अशा प्रकारचे प्रकार घ़डू नयेत यासाठी चेक पॉईंटही स्थापन करण्यात आलेले आहेत.
येथील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत राणा या रात्री १० वाजता पोहचल्या आणि त्यानंतर १०.१५ मिनिटांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. हा सरळसरळ आचारसंहितेचा भंग होता. त्यामुळे आमच्या एका पथकाकडून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी आपले भाषण तसेच पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. नवनीत राणा यांच्याही विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे माहिती एका निवडणूक अधिकाऱ्याने दिली.
Marathi e-Batmya