ठाणे आणि मिरा – भाईंदर मध्ये अनेक नवीन बांधकामे परवानग्या न घेताच सुरु आहेत. तर जुन्या कामांना अधिकाऱ्यांकडून नोटीसा दिल्या जात आहेत. एकच फेरफार असणाऱ्या मिळकतदारांवर स्वामित्वाची रक्कम एकत्रित आकारली जात आहे. हे योग्य नसून याबाबत तातडीने कारवाई करावी आणि सरकारी जमीनींवर बोर्ड लावून त्या ताब्यात घ्याव्यात असे आदेश देतानाच स्वतः मिरा भाईंदरमधील कामांची पहाणी करणार असून दोषी आढळल्यास जागेवरच कारवाई करणार असल्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिला.
आमदार नरेंद्र मेहता यांनी विधानसभेत याबाबतची लक्षवेधी मांडली होती. त्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या दालनात तातडीची बैठक घेऊन हा विषय सोडविण्यात आला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तहसिलदारांकडून आवश्यकता नसताना चुकीच्या लोकांना नोटीसा जात आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. जुन्या लोकांना नोटीस आणि नवीन बांधकामांची व्यवस्थित पहाणी केली का ? याबाबत स्वतः लक्ष घालणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या १८ परवानग्यांची आवश्यकता नवीन बांधकामांना असते. त्यांनी स्वामित्व भरले आहे का ? रेराची परवानगी घेतली आहे का ? याबाबतही तपासणी करणे आवश्यक आहे.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, गौण खनिज वाहतूक पास हे १ वर्षच सांभाळून ठेवण्याबाबतचा नियम आहे. तर, स्वामित्व भरले आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असून ज्यांनी भरली नाही त्यांना नोटीस काढल्या पाहिजेत. बांधकामांना भेटी दिल्या पाहिजेत. तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांनी या बाबी खूप काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे. ज्या जमीनी सरकारी मालकीच्या आहेत त्या जमीनींवर शासकीय मालकी म्हणून बोर्ड लावण्याची आवश्यकता आहे. तसेच रिकामे प्लॉटही ताब्यात घेण्याची गरज आहे. ते तातडीने करावेत असे आदेशही दिले.
लोक अदालतीद्वारे प्रकरणे निकालात काढा
ठाणे आणि मिरा – भाईंदर परिसरातील जुन्या लोकांच्या बांधकामाबाबत ज्या तक्रारी आहेत. त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले पाहिजे. या माध्यमातून सर्व तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेशही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. लोकप्रतिनिधी आणि लोकांच्याही कोणत्याच तक्रारी येता कामा नयेत याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.
Marathi e-Batmya