महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रत्येक मतदारसंघातील विशेषतः ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभा राहणाऱ्या मतदारसंघातील महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांपैकीची १० हजार मते कमी करायची आणि त्यांची १० हजार बोगस मते त्या मतदार यादीत समाविष्ट करायची असा कट रचलेला आहे. यासंदर्भात नागपूरात भाजपा कार्यकर्त्यांचे एक शिबिर घेतल्याचा आरोप करत यासदंर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना तुम्ही विचारा असेही यावेळी सांगितले.
संजय राऊत यांच्या याच आरोपाचा धागा पकडत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत होणारा पराभव इतका लख्खपणे दिसू लागला की, एरव्ही ईव्हीएम EVM वर बोलणारे महाविकास आघाडीचे नेते आता मतदार यादीवर बोलू लागले आहेत अशी खोचक टीका केली.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लक्षात घ्या, लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही अधिकाधिक मतदान करा,असे जनतेला आवाहन करणारे आहोत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणाऱ्या काँग्रेसवाल्यांसारखे नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
शिवसेना उबाठा पक्षावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तसेही, काँग्रेसच्या मांडीवर बसल्यापासून उबाठा नेते स्वत:चा सोडून काँग्रेसचाच अजेंडा राबवत आहेत. प्रशासनाच्या जागरूकतेने मतदार वाढल्यामुळे अंगाचा तिळपापड झालेला दिसतो अशी खोचक टीकाही यावेळी केली.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नावे मोठया संख्येत गहाळ झाल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती. ही नावे का गायब झाली? कशी गायब झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली? या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, या प्रकाराची चौकशी करा, यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने माझ्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली होती अशी आठवण करून देत तेव्हा तुम्ही का चुप्प होता? तेव्हा हा प्रश्न का उपस्थित केला नाही? बोला तुम्ही उघडे पडणार असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya