संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग… काही आजार व्याधी असल्याने त्याचे एक्स रे वगैरे काढावे लागणार

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा, काँग्रेसमधील वाद क्षमविण्यासाठी काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद आणि तब्येतीची तक्रार नसल्याचे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सांगत पुढील एक-दोन दिवसात जागा वाटपाची चर्चा होऊन उमेदवार यादी जाहिर करण्यात येईल असेही जाहिर केले. त्यानंतर काल जवळपास ८ तासापेक्षा जास्त काळ जागा वाटपाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील बैठक पार पडली. मात्र या बैठकीत विदर्भातील १२ जागा आणि भिवंडीतील जागेवर एकमत होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्ष काँग्रेसवर टीका केली.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत अद्यापही काही जणांना आजार, व्याधी आहेत. त्यांचा एक्सरे काढला पाहिजे आणि पोस्टमार्टेम केले पाहिजे अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेसचे नाव न घेता केली.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल पुन्हा महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली. मात्र त्या बैठकीत काही जागांवरील दाव्यांचा प्रश्न आला आहे. मात्र तो चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल. मात्र आज काँग्रेसचे सर्वच नेते दिल्लीत असल्याने काँग्रेसबरोबरची जागा वाटपाची चर्चा आज होणार नाही. मात्र आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीलराष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा करू ज्या काही किरकोळ गोष्टी आणि थोड्याशा राहिलेल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करून त्या अडचणी आणि जागा वाटपातील किरकोळ गोष्टी दूर करू असे सांगितले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मग काँग्रेससोबतची जागा वाटपाची चर्चा थांबविणार का असा सवाल केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, असे काही नाही आम्हा तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेससोबत असलेली चर्चा करणार आहोत. मात्र आज काँग्रेसचे सर्वच नेते दिल्लीत असल्याने त्यांच्यासोबत कोणाशी चर्चा करायची. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची चर्चा आम्ही पुर्ण करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

यावेळी अन्य एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने संजय राऊत यांना विचारले की, महाविकास आघाडीत मतभेद आहेत का त्यामुळेच जागा वाटप रखडलेय का, त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. जे काही आहे ते जागा वाटपाच्या अनुषंगाने आहे. त्यामुळे त्याला मतभेद म्हणता येणार नाही. काँग्रेस नेते आले की, त्यांच्यासोबत राहिलेली चर्चा पुर्ण करू असेही यावेळी सांगितले.

तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना म्हणाले , ज्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान झाले, त्या भागातील अर्थात मतदारसंघातील ज्या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा प्रत्येक मतदारसंघातील १० हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रयत्न भाजपाने निवडणूक आयोगाला हताशी धरून सुरु केल्याचा आरोप करत यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला मिळणाऱ्या मतदारसंघाचा समावेश करण्यात आला नाही. ते वेगळं ठेवण्यात आल्याचा खळबळ जनक आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, यासंदर्भात नागपूरात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारे एक शिबिर नागपूरात झाले. ते शिबिर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. हवं तर तुम्ही चंदेरशेखर बावनकुळे यांना विचारा असेही यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील १२ जागांवरून मतभेत झाले असल्याचे सांगत त्या जागांवर काँग्रेसनेही दावा केला आहे आणि शिवसेना उबाठा गटानेही दावा केला आहे. या जागांबाबत हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील बेबनाव वाढू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादावर मध्यस्थी करणार असल्याचे बोलले जात आहे.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *