संजय राऊतांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; कसले खोके, मिठाईचे का? मुंबई तोडण्याच्या आरोपावर शिंदे म्हणाले अशी काही चर्चा आमच्यात नाही

महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीवारीवर आले. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तर आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना सवाल केला की, संजय राऊत यांनी बंडखोरांना ५० खोकी पोहचली असून ती खोकी पचणार नसल्याची टीका केली असल्याबाबत विचारले. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कसले खोके, मिठाईचे का? नाही हे बघ काहीजण काहीही बोलत असतात त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही.

सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या अनेक वरिष्ठ राजकीय नेतेमंडळीच्या भेटीगाठी ते घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी खोचक शब्दांत टीका केली. फक्त ५०? पण ५० खोके कसले? मिठाईचे की अजून कसले? असा प्रतिप्रश्न विचारत शिंदेंनी टोला लगावला.

एखादा ग्रामपंचायत सदस्यही इकडून तिकडे जायला चार वेळा विचार करतो. हे ३-४ लाख लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. आम्ही सभागृहात सावरकरांच्या बाबतीत बोलू शकत नव्हतो. अनेक मुद्द्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की, अन्यायाविरोधात पेटून उठा. आमचं हे बंड नाहीये, हा पक्षातला मोठा उठाव आहे. हे सगळे स्वेच्छेने आलेले आहेत. ते पैशाने विकले जाणारे नाहीयेत. त्यांना आता दुसरं काहीच नाहीये आरोप करायला. ते करत बसतील अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

तसेच संजय राऊत यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेल्याच्या आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले, असं कोण म्हणालं, कोणी बोललं ? आमच्यात तर तशी चर्चाही नाही की बोलणंही नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. पण मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. त्यांना सगळं कळतंय. आम्ही आमचं काम करत राहू. कुणीही काहीही बोललं तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. जे अडीच वर्षापूर्वी स्थापन व्हायला हवं होतं, ते सरकार आम्ही आता स्थापन केलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत काय म्हणाले ?

शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ शकत नाही. ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. १०० आमदार आणि २५ खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना ५० खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील. शिवसेनेसोबत बेईमानी करणे सोपे काम नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. शिवसेनेचा हायकमांड मुंबईत आहे. शिवसेनेचे हायकंमाड म्हणजे उध्दव ठाकरे आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री आदेश घ्यायला कधी दिल्लीत जात नाही. ते त्यांचे हायकमाड आहेत. त्यामुळे ते दिल्लीत गेल्याचा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *