जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरीक ठार झाले. या अतिरेकी हल्ल्याला प्रतित्युर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरतंर्गत कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना उद्धवस्तही केले. मात्र भारतीय सैन्याकडून कारवाई सुरु असतानाच अचानक भारताने पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली. परंतु या युद्धबंदीची घोषणा सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तेव्हापासून २० हून अधिकवेळा या युद्धबंदीचे श्रेयही डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहिररित्या आतापर्यंत अनेक वेळा घेतलेही. तसेच या संदर्भात विरोधी पक्ष काँग्रेससह इंडिया आघाडीनेही यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. परंतु त्यास सत्ताधारी भाजपाने कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. त्यातच देशभरातील अनेक राज्यांमध्ये निवडणूकांचा माहौल आहे. तसेच महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वातावरण असताना ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. या आधारेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव काळात ऑपरेशन सिंदूरचे देखावे सादर करावेत असे आवाहन गणेश मंडळांना केले.
मुख्यमंत्री फडणीस यांनी यावेळी बोलताना आवाहन केले की, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे हा महोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील. हा उत्सव साजरा करताना कायद्याचे योग्य पालन करावे. ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही यावेळी सांगितले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यास, अशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव (विशेष) अनुपकुमार सिंग, बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश दहिबावकर आदींसह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, गणेशोत्सव समित्या आणि मूर्तिकार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सहभाग घेतला. बैठकीत महापालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी सादरीकरण केले.
त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेलची विमाने गमावल्याबाबत चीफ ऑफ आर्मी स्टाफ चौहान यांनीही ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपली भारताची विमाने पाकिस्ताने पाडल्याचा दावा केला. परंतु किती विमाने पाडली गेली याचा निश्चित आकाडा दिला गेला नाही. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर राबविताना देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला कळविल्याचे त्यांनी दस्तूर खुद्द कबुली दिली. त्यामुळे या संपूर्ण ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांबरोबरच अनेक भारतीयांच्या मनात शंका आहेत. मात्र ऑपरेशन सिंदूर हे भाजपाच्या राजकिय अजेंड्यावरचा विषय आहे. त्यामुळे हा भाजपाचा हाच अजेंडा राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याने यासंदर्भात राजकिय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.
Marathi e-Batmya