मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मान्यता नाशिक जिल्ह्यातील मालसाणे णमोकार तीर्थ विकास

नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मियांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी येण्याचे आत्मिक समाधान मिळावे अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

या ठिकाणी करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, कोणत्याही कामात तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या ठिकाणी ६ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील २४ कोटी २६ लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता १२ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, णमोकार तीर्थ येथे येणाऱ्या भाविकाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. संबंधित यंत्रणांनी सर्व सोयीसुविधा येथे भाविकांना उपलब्ध करून द्याव्यात. देश – विदेशातून येथे भाविक येणार असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी येण्याचे समाधान मिळेल, अशा पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करावे. महोत्सव आयोजनासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्वच्छतेसाठी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. येथील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा, असे निर्देशही दिले.

या तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने विकास आराखडा राबविण्यात यावा. हे ठिकाण जैन धर्मियांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून १० ते १५ लाख भाविक येतील. हा सोहळा यशस्वी करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे सादरीकरण केले. यावेळी अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, सचिव (नियोजन) शैला ए, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, णमोकार तीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोडक्यात णमोकार तीर्थ विकास आराखडा

णमोकार तीर्थ हे जैन धर्मस्थळ असून नाशिक – धुळे महामार्गावर मौजे मालसाणे गावाजवळ ४० एकरावर स्थित आहे. आराखडा अंतर्गत णमोकार तीर्थ क्राँकिट रस्ता तयार करणे, संरक्षक भिंत बांधकाम, नौकायन बांधकाम, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छतेसाठी कामे करण्यात येणार आहे.

या ठिकाणी ६ ते २५ फेब्रुवारी २०२६ कालावधीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पाण्याच्या टाक्या बसविणे, ४५० युनिट टॉयलेट ब्लॉक उभारणी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, तात्पुरती वैद्यकीय युनिट स्थापना करण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *