पडळकर-आव्हाड प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत खेद व्यक्त करायला लावला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी या प्रकरणाशी संबधित आमदाराने धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित करताना भाजपाच्या सदस्यांनी आव्हाड यांना मुद्यावर बोला असा आग्रह धरला. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही मुद्यावर बोला असे आवाहन केले.
त्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे म्हणाले की, आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यांना का रोखता असे प्रतिप्रश्न बोलत आव्हाड यांना बोलू द्या अशी मागणी केली.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयंतराव (पाटील) कधी तरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन कधी बघा, फक्त राजकारण करण्याच्या उद्देशानेच सगळे मुद्दा बघायचे नसतात. काल इथे जे काही झाले. त्यामुळे एका माणसाची प्रतिष्ठा गेली नाही. तर संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले. इथे बसलेल्या प्रत्येक आमदाराच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलेले आहे. हे काही बरं नाही. आज बाहेर एकट्या गोपीचंद पडळकर यांना शिव्या पडत नाहियेत. आपल्या सर्वांना शिव्या पडत आहेत. लोक बाहेर म्हणतायत की सगळे आमदार माजलेत.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी धमकीचा उल्लेख करण्यास आमची मनाई नाही. परंतु सध्या जो विषय सुरु आहे त्यावर बोललं पाहिजे. विधानसभेत एखादा प्रस्ताव मांडला असेल तर त्यावर चर्चा करायला हवी. आव्हाड याचं काही म्हणण असेल ते वेगळं मांडता येईल. परंतु आता विधानसभा अध्यक्षांनी आपल्याला एक विषय दिला आहे. त्यावर बोलू या असे सांगत जयंत पाटीलजी तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही तरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे असे सांगितले.
Marathi e-Batmya