मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्तेचे आव्हान…शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमकेसीएल’च्या नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमांत राज्य शासनही अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, ‘एमकेसीएल’चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ.विवेक सावंत, ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज कृत्रिम बुद्धीमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर असतांना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग झाला आहे. या परिस्थितीत नवी मूल्ये आणि आव्हाने ओळखून पुढे जावे लागेल. क्वांटम कम्युटींग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपीटल आहे. देशातील ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे, या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रयत्न ‘एमकेसीएल’ने करायला हवे. राज्य शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान लाटेप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळात आपल्याला पुढे रहावे लागेल. रोजगाराचे स्वरुप बदलत असतांना नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी केली तर राज्य शासन त्याला निश्चितपणे सहकार्य करेल. ‘एमकेसीएल’चे विविध उपक्रम समाजासाठी आणि शासनासाठी उपयुक्त ठरले आहेत. ‘एमकेसीएल’ने विकसित केलेल्या नव्या संकेतस्थळावर ५० हजार पुस्तके वाचता येणार आहेत. ‘एमकेसीएल’च्या विविध प्रकल्पामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षात उत्तम प्रकारचे बदल ‘एमकेसीएल’ने घडवून आणले आहेत, असे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, कुठल्याही समाजजीवनात नेहमी आव्हाने येत असतात आणि त्यावर उत्तरे शोधणाऱ्या व्यक्ती-संस्था उभ्या राहतात. जगात इंटरनेटची लाट आली असतांना डिजीटल विषमतेसंदर्भातील समाजजीवनापुढच्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासोबत ते सर्वांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था उभी करण्याचे कार्य महाराष्ट्र ज्ञान मंडळाने केले. समाजातील एक विशिष्ट वर्गाला पुढे आणण्यासाठी केवळ लाभाचा विचार न करता दीर्घकालीन लाभ लक्षात घेऊन ‘एमकेसीएल’ने जबाबदारीने उत्तम प्रकारचे कार्य केले. राज्यात साडेसहा हजार उद्योजकांचे जाळे आणि कोणत्याही क्षणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या माध्यमातून उभी राहिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण या व्यवस्थेत आणू शकलो, अशा शब्दात ‘एमकेसीएल’च्या कार्याचे कौतुक केले.

राज्यातील जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात ‘एमकेसीएल’ची भूमिका महत्त्वाची – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या २५ वर्षात जगभरात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे कार्य अखंडपणे केले. संस्थेने संगणक साक्षरतेपासून सुरूवात करून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संगणकीय तंत्रज्ञान पोहोचविले. डिजीटल युगात ग्रामीण भागात नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य संस्थेने केले. जगात कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे विविध क्षेत्रात वेगाने बदल घडत असतांना बदलत्या तंत्रज्ञान युगासाठी तरुण पिढीला सक्षम बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘एमकेसीएल’ आणि माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे तंत्रज्ञान संशोधन संस्था उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तंत्रज्ञान युगात राज्यातील विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याची गरज आहे. आपल्या लोकसंख्येचे रुपांतर मानवी भांडवलात केले तरच देशाला प्रगती करता येईल. ज्ञान, कौशल्य, नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याची गरज आहे. ‘एमकेसीएल’ने यासाठी पुढाकार घेऊन नवीन डिजीटल उत्पादने, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि समाजाभिमुख उपक्रम आणण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्थेने या संदर्भात शासनाला उपयुक्त सूचना कराव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आगामी काळ कृत्रिम बुद्धीमत्तेचा असल्याने शासनाने कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता शहर स्थापित करण्यात येणार आहे. नव्या पिढीला उत्तम शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पाच परदेशी नामवंत विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘एमकेसीएल’ने अधिक व्यापक दृष्टीकोन ठेवून कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, ब्लॉकचेन अशा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे जीवन सुलभ, समृद्ध आणि ज्ञानसमृद्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले. ‘एमकेसीएल’ प्रत्येक जबाबदारीला न्याय देईल आणि महाराष्ट्राच्या ज्ञानयात्रेतील डिजीटल प्रगतीत महत्त्वाचा दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात येईल – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ शासनासाठी अभिमानास्पद असून ज्ञान आणि कौशल्याला ‘एमकेसीएल’ महत्त्व देत असल्याने ही ज्ञानमार्गातील चळवळ झाली आहे. २ कोटी प्रशिक्षणार्थींना संस्थेने माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. जगात प्रगती करतांना मराठी भाषेसोबत तंत्रज्ञानाचे शस्त्र आवश्यक आहे हे ‘एमकेसीएल’ने ओळखले आणि डिजीटल साक्षरतेचा प्रसार केला. ६ हजारावर केंद्र सुरू करून कृत्रिम बुद्धीमत्तेचा समावेशही प्रशिक्षणात केला. डिजीटल साक्षरतेसंदर्भात सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य एमकेसीएलने २५ वर्षात केले आहे.

ई-गव्हर्नन्सकडून एआय गव्हर्नन्सकडे वळतांना ‘एमकेसीएल’चे सहकार्य आणि सहभाग अपेक्षित आहे. विकसीत महाराष्ट्र घडविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था उभारण्यात ‘एमकेसीएल’बरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग कार्य करेल आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार करा – डॉ.अनिल काकोडकर

डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलाढाल होत असतांना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून देखील समाज परिवर्तनाचे कार्य करणे शक्य आहे हे महाराष्ट्र ज्ञान मंडळाने दाखवून दिले. देशात आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रगती घडवून आणण्यासाठी ज्ञानक्षेत्रात खूप काही करण्यास वाव आहे. येत्या काळात विकसीत राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सामरिक आणि आर्थिक शक्तीसोबत तात्विक शक्ती मिळणे आवश्यक आहे आणि हे ज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे. ‘एमकेसीएल’चे हेच उद्दीष्ट असायला हवे.

विविध प्रकारच्या क्षमता असणाऱ्या व्यक्तींच्या परस्पर सहकार्याने अधिक समृद्ध समाज निर्माण करू शकू. जगभरात संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे. जगभरात उन्नत तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे. उद्योग आणि संशोधनाचा समन्वय साधण्यासाठी ‘एमकेसीएल’ने प्रयत्न केल्यास देशाला आवश्यक कार्य करणे शक्य होईल. त्यासोबतच डिजीटल ज्ञानावर आधारित विषमता कमी करण्यासाठी ग्रामीण भागात काम करणे सर्वात प्रभावी उपाय आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता सक्षम ग्रामीण युवक तयार केल्यास ही विषमता लवकर दूर होऊन आर्थिक प्रगतीला गती मिळेल. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन डॉ.काकोडकर यांनी केले.
यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकात ‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक डॉ.विवेक सावंत यांनी ‘एमकेसीएल’च्या वाटचालीची माहिती दिली. ६ हजार ३०० उद्योजकांनी समाज परिवर्तनाच्या उद्दिष्टाने एकत्रितरित्या कार्य करून ‘एमकेसीलएल’चे काम पुढे नेले आहे. ग्रीन कॉलर जॉबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एमकेसीएलने गेल्या २४ वर्षात सेवेतील आनंद घेतला, असे सांगितले.

मराठी साहित्याबाबत अद्ययावत माहिती डिजीटलस्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘एमकेसीएल’तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘मराठी साहित्यसृष्टी’ या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘प्रांजळाचे आरसे’ या पुस्तकाचे डॉ.काकोडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-पुस्तकांचे प्रकाशन

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवसाच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘युनिफाईड क्रेडीट इन्टरफेस’ या ॲपचे लोकार्पणही श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याने विविध अभ्यासक्रमातून मिळविलेले क्रेडीट त्याच्या पदवीत रुपांतरीत करण्यात सुलभता येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या डिजीटल साक्षरतेतील मोठी क्रांती एमकेसीएलने केली आहे. डिजीटल ज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एमकेसीएल’ने नव्या ॲपची माहिती सोप्या सुलभ भाषेत तयार करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. डिजीटल ज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन करून देशाला पुढे नेण्यात ‘एमकेसीएल’ने योगदान द्यावे. समाज साक्षर होत असतांना डिजीटल निरक्षरता दूर करण्यासाठी ‘एमकेसीएल’ने मोबाईल संगणक प्रयोगशाळेसह विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन  केले.

शेवटी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील ९० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे क्रेडीट अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमाचे क्रेडीट्स विद्यार्थ्यांना मिळणार असून त्या विषयाचे पुढील शिक्षण घेतांना ते उपयोगात येणार आहे. जागतिक स्तरावरील नामांकीत विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्य शासनाने पाच विद्यापीठांशी सामंजस्य करार केले असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *