मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश व्हावा यासाठी अनेक आमदार प्रयत्नशील आहेत. मागील सरकारमधील राज्यमंत्री दिपक केसरकर, दादाजी भुसे या राज्यमंत्र्यांना थेट कॅबिनेट पदी बढती देण्यात येणार आहे. तर सुनिल प्रभु यांना पक्षप्रतोद पदावरून कॅबिनेट मंत्री पदी बढती देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हाती घेतल्याने मंत्रिमंडळात सर्व आमदारांना सोबत घेवून त्यांच्याशी सामंज्यसाने वागणाऱ्या आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार दादाजी भुसे, दिपक केसरकर यांना बढती देत स्वतंत्र खाती देण्यात येण्यात येणार आहेत. त्याशिवाय माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासह शंभुराजे देसाई, अंबादास दानवे, भास्कर जाधव या नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गतवेळच्या सरकारमधील माजी मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, रविंद्र वायकर, संजय राठोड, अर्जून खोतकर आदी माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी न देता त्यांना पक्ष संघटनेत महत्वाची पदे देण्यात येणार आहेत. याशिवाय नव्याने निवडूण आलेले बहुतांष आमदारांना यंदा संधी देण्यात येणार असून अनेक नवख्या आमदारांना राज्यमंत्री पदी नियुक्त करण्यात येणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेला जागा मिळाल्यामुळे या भागातील काहीजणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळात कॅबिनेट नाहीतरी किमान राज्यमंत्री म्हणून समावेश करावा यासाठी अनेक आमदार मातोश्री बंगल्यावरील वजनदार व्यक्तींच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
Marathi e-Batmya